12.05.2019

चहा – अमृततुल्य की विषवल्ली


चहा – अमृततुल्य की विषवल्ली
लेखक – प्रा. डॉ. विधिन कांबळे, सांगोला महाविद्यालय, सांगोला 

इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले आणि सर्व भारतीयांना गुलाम केले.  हे विष सुद्धा आपण पचवले.  इंग्रजानी साधारणतः दोनशे ते दीडशे आपल्या देशात आगमन केले. तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर चहा नावाचे गोड सोबत आणले होते.  ते विष आजही इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीचे प्रतिक आपण घोट-घोट पीत आहोत. आता तर चहा पिणे इतके प्रतिष्ठेचे झाले आहे की, एखाद्याला चहा न पाजणे अपमान वाटतो. शहराबरोबरच खेडेगावातही चहाची थाटलेली दुकाने पहावयास मिळतात. चहा हे सर्वांचेच आवडते पेय झाले आहे. अगदी एक-दीड  वर्षाच्या मुलापासून ते जर्जर वृध्दापर्यंत सर्वानाच चहा पिणे आवडते. पाहुणचार म्हणून चहाला विशेस महत्व आहे. परंतु विनाकारण दिवसातून ४-५ कप ढोसणारे महाभाग काही कमी नाहीत. काही लोक तर भूक मारण्यासाठी चहा पिताना आढळून येतात. चहा पिल्यामुळे मेंदूला तात्पुरती तरतरी येते व ताजेतवाने वाटते. त्यामुळेच वरवर चहा पिल्यामुळे चहाचे व्यसन जडते.
एक काळ असा होता की, नाक्यावरच्या एखाद्या कोपऱ्यावर अंधुक दिवा असलेली चहाची टपरी अथवा मोडकळीस आलेला चहाचा गाडा एस. टी. चुकलेल्या वाटसरूसाठी आधार देण्याबरोबरच प्रवासातील थकवा घालवण्याचे अत्यंत प्रभावी साधन होते. परंतु आज अनेक शहरामध्ये चौका-चौकात अमृततुल्य समजल्या जाणाऱ्या चहाचे फलक लावून विद्युत रोषणाईने सजलेली दुकाने लोकांना आकर्षित करीत असतात व गरज नसताना ‘गोड विषाचा’ कप घशाखाली रिचवण्यासाठी भाग पडतात. हल्ली आफिसमधून बाहेर पडलेले चाकरमान्यासाठी चहाची दुकाने संवादाची केंद्र बनलेली आहेत. गप्पा मारत गरम चहाचे कप आपल्या घशात ओतत असतात.
चहामध्ये मेंदूला उत्तेजित करणारे टॅनिन, कॅफिन इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर असतात. चहामध्ये घातलेली साखर शरीरात त्वरित उर्जा निर्माण करते. व्यक्तीला ताण-तणाव दूर झाल्यासारखे वाटते. त्यामुळे लोक चहा आवडीने पितात व मादक किंवा अमलीपदार्थासारखे चहाचे व्यसन जडते. अमलीपदार्थांचा कैफ बराच काळ टिकतो तसे चहाने सुद्धा तात्पुरती तरतरी येते व व्यक्ती थोड्या वेळासाठी ताजातवाना होतो.चहामध्ये कॅफिन हा घटक मोठ्या प्रमाणावर आढळतो. मेलबर्नमधील डिकिन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असणाऱ्या कॅफिनचा गुणधर्म हा त्या पदार्थाची चटक व व्यसन लावण्यासाठी केला जातो असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळेच चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे चहाची चटक लागते  व चहाचे व्यसन जडते. चहा पिण्याचे तात्पुरते फायदे कमी आणि शारीरिक नुकसान जास्त होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
साखरयुक्त चहाच्या एका कापत जेवढी साखर असते त्यापासून ४० ते ४५ कॅलरीज आपल्या शरीराला मिळतात. दिवसात ४ ते ५ कप चहा घेणाऱ्या व्यक्तींनी याचा विचार करावयास हवा. चहाबरोबर ब्रेड , टोस्ट, बिस्कीट इत्यादी पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. ज्यामुळे आपल्या शरीरात कॅलरिजची आणखी भर पडते. त्याचा अनिष्ठ परिणाम म्हणून रक्तदाब, वजन वाढणे, हृदयाची धडधड वाढणे, किडनीवर जास्त दबाव येतो, चरबी वाढते, मधुमेह अशा आजारांचा धोका संभवतो. त्यामुळे खूप चहा पिणाऱ्या क्तींनी याचा विचार जरूर करावा. अतिरिक्त साखरेमुळे शरीरात अनेक आजार बळावतात. आपल्या शरीरात जादा साखरेचे रुपांतर चरबीमध्ये होते व लठ्ठपणा वाढण्याचे साखर हे महत्वाचे कारण आहे. अतिरक्त साखरेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते व वाढलेल्या साखरेला नियंत्रित करतना स्वादुपिंड निकामी होते यालाच आपण मधुमेह किंवा डायबेटीस असे म्हणतो.  चहामुळे तोंड येणे, पचनक्रिया बिघडणे, भूक मंदावते, शरीराची उष्णता वाढते. त्याच बरोबर कफ व पित्ताचे प्रमाणही वाढते. अति चहा पिणे हे निद्रानाश, मळमळ, डोकेदुखी चिडचिड, मानसिक त्रास इत्यादीला कारणीभूत ठरते. खरं तर भारत देश हा समशीतोष्ण प्रदेश असल्यामुळे पाश्चिमात्य देशाप्रमाणे आपल्याला चहा पिण्याची गरजच नाही. मधुमेही, हृद्य विकार असलेल्या व्यक्तीं आणि लठ्ठ  व्यक्तींनी चहापासून दूर राहिलेलेच बरे. डॊ. हेरल्ड आणि आर. जे. किस्ट या शास्त्रज्ञांनी कॅफिन वर अनेक प्रयोग केले. त्यांच्या म्हणण्यानुसार कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक अठरा वर्षा खालील व्यक्तीस विकू नये.इतके अन्सिष्ट परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतात असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे भारतातील समान्य माणसांनी कॅफिनपासून दूर रहाण्यातच हित आहे.
खूप चहा प्यायल्याने शरीरातील कॅल्शियम शोषून घेतले जाते. शरीरात कॅल्शियम वाढीसाठी औषध घेणाऱ्यानी कॅल्शियमची गोळी व चहा एकत्र घेऊ नये.
एकूनच काय, चहा आपल्या शरीराची मरगळ घालवून तरतरी आणणारा असला तरी चहाशौकीन मंडळीनी वरील बाबी लक्षात घेतल्यास चहाला ‘अमृततुल्य’ समजायचे की ‘विषवल्ली’ ठरवायचे हे समजून येईल. या लेखाचा उद्देश लोकामध्ये जागृती निर्माण व्हावी असा आहे.  

4 Comments:

At 21 December 2019 at 22:22 , Blogger Unknown said...

Nice thought about tea

 
At 19 April 2021 at 00:05 , Blogger Dr. Vidhin Kamble, Sangola College, Sangola said...

Thank You

 
At 18 April 2023 at 05:46 , Blogger योजना said...

Thankyou ♥️ sir you are superb, seriously 🙏🙏🙏

 
At 20 April 2023 at 02:31 , Blogger योजना said...

Very good information 😉😉

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home