4.24.2023

राजऋषी गणपतराव देशमुख ( Shri Ganpatraoji Deshmukh - MLA) लेखक कविवर्य इंद्रजित भालेराव



 राजऋषी गणपतराव देशमुख 

लेखक  कविवर्य इंद्रजित भालेराव 



सांगोल्याचा विषय निघाला की अपरिहार्यपणे गणपतराव देशमुख यांचं नाव समोर येतंच. योगायोगानं माझ्या आणि गणपतरावांच्या काही भेटीही झालेल्या आहेत. त्यांच्या ८८ व्या वाढदिवसाला मी पाहुणा म्हणून गेलो होतो. एकदा कुठल्यातरी कार्यक्रमाला सांगोल्याला गेलो तेव्हा सूतगिरणीच्या अतिथीगृहात थांबलो होतो, तेव्हाही गणपतरावांची भेट झाली होती. एकदा शिवाजीराव बंडगर या कवीमित्राच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला गेलो तेव्हाही गणपतरावांची भेट झाली होती. त्या कार्यक्रमाचे गणपतराव अध्यक्ष होते. 

पण ह्या भेटीगाठीपेक्षाही गणपतराव कितीतरी मनात रुजलेले होते ते त्यांच्या कर्तृत्वामुळं. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे एक अपवादभूत व्यक्तिमत्व. जो माणूस सतत ११ वेळा निवडणुका जिंकला, ५१ वर्ष विधानसभेत निष्कलंक राहिला, आपल्या वयोवृद्ध अनुभवाचा सर्वांना फायदा देत आला, ज्याच्या मतदारसंघात कापसाचं बोंडही पिकत नव्हतं त्या ठिकाणी आदर्श सूतगिरण्या चालवून एक चमत्कार घडवून आणला, ज्या माणसानं पंढरपूर वरून प्यायचं पाणी सांगोला मतदार संघात आणून गावागावात नेलं, आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, ज्या पंढरपुरातून पाणी आणलं त्या पंढरपुरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असताना सांगोल्यात आणि तालुक्यातल्या ८२ गावात मात्र गावोगाव आणि घरोघरी वेळेवर पाणी येत होतं, ज्या माणसानं वर्षानुवर्ष दुष्काळ परिषदा आणि पाणी परिषदा घेऊन जागृती केली, भयान दुष्काळी भागाला ओलिताखाली आणण्यासाठी अनेक प्रकल्प मार्गी लावले, त्यासाठी आंदोलन केली, धरणे धरले, शासनाचा पाठपुरावा केला, ज्या माणसानं आयुष्यात चुकूनही आपला शेतकरी कामगार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचा विचारही केला नाही, वेळोवेळी वेगवेगळ्या सरकारकडून मंत्रीपदाच्या ऑफर आल्या असतानाही ज्या माणसानं पक्षनिष्ठा ढळू दिली नाही, जो आयुष्यभर तत्वाशी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिला, ज्या पक्षाची वाताहात झालेली दिसत असतानाही तो पक्ष सोडून तो इतर पक्षात गेला नाही, काम तर एवढं निर्मळ ही भ्रष्टाचार चुकूनही मतदारसंघात कुठं होऊ दिला नाही, केला नाही, त्यामुळे विकासातून विकास, विकासातून विकास असेच फाटे फुटत गेले, सगळ्यात जास्त दुष्काळी असलेला हा भाग सगळ्यात सुकाळी करण्याचा या माणसानं आयुष्यभर जीवतोड प्रयत्न केला. ज्या माणसानं राजकारणात नेहमीच कोणाच्या वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य दिलं. असा हा एक आगळा वेगळा माणूस.

१९८० साली गणपतरावांनी शेतकरी सहकारी सुतगिरणी सुरू केली. गणपतरावांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पक्षाचं नावच होत शेतकरी कामगार पक्ष, त्यांच्या सूतगिरणीचं नाव होतं शेतकरी सहकारी सूतगिरणी, त्यांनी काढलेल्या शिक्षण संस्थेचं नाव आहे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण संस्था, म्हणजे गणपतरावांनी आपल्या प्रत्येक कामात शेतकरी हा केंद्रीभूत मानलेला आहे. प्रत्यक्ष तसं आचरण करून दाखवलेलं आहे. गणपतरावांनी शेतकरी सुतगिरणी काढली आणि तिचा नफा इतका झाला की त्यातून त्यांना शेतकरी सूतगिरणीच दुसरं युनिट काढावं लागलं. या दोन्ही गिरण्यांचा नफा वाढतच गेला. कारण तिथं भ्रष्टाचार करणारं कुणीही नव्हतं. त्यामुळं नफा सरळच शिल्लक राहत होता. त्यातून त्यांनी खास महिलांची म्हणून तिसरी सूतगिरणी काढली. अर्थात गणपतराव या सूतगिरण्यांमध्ये कुठेही कधीही पदावर नव्हते. त्यांनी सतत आपल्या कार्यकर्त्यांना मानाच्या जागा दिल्या. आणि आपल्या अनुभवी मार्गदर्शनाखाली या सूतगिरण्यांची प्रगती घडवून आणली

या सूतगिरण्यांमुळे सांगोल्याच्या दुष्काळी भागातून स्थलांतरित होणारी कुटुंबं आपल्याच गावी सुखानं आणि आनंदानं राहू लागली. या सूतगिरण्यांचा हा आदर्श कारभार पाहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्या सूतगिरण्यांची दखल घेतल्या गेली. जगभरातून या सूतगिरण्यांच्या सुताला मागणी आली. सूत निर्यात होऊ लागलं आणि देशाला परकीय चलन मिळू लागलं. या आदर्श कारभारामुळे सूतगिरण्यांना राष्ट्रीय पातळीवरील सहकाराची अनेक पारितोषिक मिळाली. सूतगिरण्यांचा नफा कामगारांमध्ये वाटप केल्यामुळं कामगारांना आपल्या गृहनिर्माण सोसायट्या तयार करता आल्या. सूतगिरण्यांच्या नफ्यातूनच गणपतरावांनी सामूहिक विवाहाच्या संकल्पना राबवल्या, दुष्काळाच्या काळात सूतगिरण्यांच्या आर्थिक नफ्यातून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या हा तर एक वेगळाच आदर्श होता. ह्या केवळ सूतगिरण्या नव्हत्या तर सांगोल्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा तो मानदंडच ठरला. या सूतगिरण्यासोबतच आमच्या मराठवाड्यात निघालेल्या सूतगिरण्यांचे नटबोल्टही शिल्लक नाहीत. तिथं या सूतगिरण्या दिमाखानं उभ्या असून सतत नफ्यातच आहेत. आता या व्यवसायाला राष्ट्रीय पातळीवर घरघर लागली असतानाही सांगोल्यातल्या सूतगिरण्या मात्र आदर्श पद्धतीनं सुरूच आहेत.

गणपतरावांनी शिक्षण संस्था काढली, पण सगळीकडं आपल्याच शिक्षण संस्थेची महाविद्यालये आणि शाळा काढल्या नाहीत. वेगवेगळ्या लोकांना जागोजाग संस्था काढायला लावून त्यांच्या शाळांना विनामूल्य परवाना मिळून दिला. दुसऱ्या कोणी महाविद्यालय काढलं तर त्यालाही सर्वतोपरी मदत केली. नाही तर चार-पाच महाविद्यालये आणि पाच-पन्नास शाळा काढून शिक्षण महर्षी होणं त्यांना सहज शक्य होतं. पण गणपतरावांनी तसं केलं नाही. सगळ्या अधिकारांचं सगळ्यांपर्यंत वितरण झालं पाहिजे हा लोकशाही शब्दाचा खरा अर्थ गणपतरावांना समजलेला होता.

गणपतरावांच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं निखळ मोठेपण महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांना मान्य होतं. त्यामुळं बहुतेक पक्ष त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करीत नसत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापर्यंत एकदाही त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही वाटायचं की गणपतरावाच्या विरोधात आपण उमेदवार उभा करू नये. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला तर त्यांच्या विरोधात शक्यतो इतर पक्ष उमेदवार देत नसत. त्यामुळे गणपतरावांचा सतत लढत झाली ती काँग्रेस पक्षाशी. आणि त्यातल्या त्यात शहाजीबाबू पाटील यांच्याशी. शहाजी बापूंनी त्यांच्या विरोधात सहा वेळा निवडणुका लढवल्या. त्यातल्या एकाच वेळी शहाजीबापू निवडून आले. गणपतरावांसारखा अनुभवी आणि आदर्श माणूस विधानसभेत असावा असं सगळ्याच पक्षांना वाटायचं. त्यांच्या अनुभवाचा फायदा विधानसभेला व्हावा म्हणून अनेकदा गणपतरावांचं मार्गदर्शन घेतलं जायचं.

या माणसाचं जगणं, या माणसाचा आदर्श मी नेहमीच माझ्या भाषणातून वेळोवेळी महाराष्ट्रभर सांगत आलेलो आहे. असाही एक माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आहे याचं वेळोवेळी लोकांना आश्चर्य वाटत आलेलं आहे. अशा माणसाच्या गावी होणाऱ्या साहित्य संमेलनाला मी तीन दिवस होतो. पण आता गणपतराव देशमुख नव्हते. दोन वर्षांपूर्वी नुकतंच वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण चार महिन्यापूर्वीच त्यांच्या शिक्षण संस्थेतले एक प्रा. डॉ. किसनराव माने यांनी 'राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख' हा ग्रंथ लिहिला. तो त्यांनी मला भेट म्हणून पाठवला होता. त्यामुळे गणपतराव नसले तरी माने सरांना भेटूयात आणि गणपतरावांच्या आठवणींचा उजाळा देउयात असं मी ठरवलं. 

सरांनी दिलेलं पुस्तक मी केव्हाच वाचलं होतं. सरांना कळवायचं राहून गेलं होतं. म्हणून संमेलनाला आलो तेव्हा सरांना फोन केला. माने सर म्हणाले, सर आपण तर भेटूयातच पण गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनाही तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, तेव्हा आपण त्यांच्याकडंही जाऊयात. मलाही उत्सुकता होतीच. गणपतरावांच्या भेटी जरी बाहेर झाल्या असल्या तरी सांगोल्यात त्यांच्या घरी मला जाता आलं नव्हतं. म्हणून संमेलन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेब देशमुख यांच्याकडे जायचं ठरवलं. त्याआधी माने सरांनी स्वतःच्या घरी नेलं. त्यांच्या नवीन आलिशान घरात त्यांनी आमचं स्वागत केलं. मग आम्ही बाबासाहेब देशमुख यांच्याकडं गेलो.  

गणपतराव असे तत्वनिष्ठ राजकारणी होते की त्यांनी आपण असेपर्यंत आपल्या नातलगांना, मुलांना कधी राजकारणात येऊ दिलं नाही. जो काही वाव द्यायचा तो आपल्या कार्यकर्त्यांनाच दिला पाहिजे म्हणून मुलांना त्यांचे त्यांचे व्यवसाय करायला लावून कार्यकर्त्यांना राजकारणात वाटा देण्याचं काम गणपतरावांनी आयुष्यभर केलं. पण गणपतरावांच्या निधनानंतर लोकाग्रहास्तव बाबासाहेब देशमुख यांना राजकारणात यावं लागलं. ते गणपतरावांचे नातू , एमबीबीएस डॉक्टर आहेत. पण लोकाग्रहास्तव त्यांना राजकारणात उतरावं लागलं. तोच साधेपणा, तीच मनमळावू वृत्ती, तीच सामान्य माणसासाठी झिजण्याची असोशी नातवात उतरलेली पाहून मला खूप आनंद वाटला. 

गणपतरावांचं घर, त्यांची बसण्याची जागा, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बसण्याच्या खुर्च्या, त्या बैठकीतलं ते साधेपण गणपतरावांची सतत आठवण करून देत होतं. गणपतरावांच्या किसनराव मानेंनी लिहिलेल्या चरित्राविषयी इथंच लिहिलं पाहिजे. गणपतराव देशमुख यांच्या कारकिर्दीला न्याय देणारं असं हे पहिलंच पुस्तक डॉ. माने यांनी लिहिलेलं आहे. गणपतराव कुणाला दाद देत नसत. त्यांना स्वतःची प्रसिद्धी नको असे. राजा कांदळकरांनी गणपतरावांना बोलतं करून त्यांचं आत्मकथन लिहिण्याचा, शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला  पण गणपतरावांनी त्यांना फारशी दाद दिली नाही. म्हणून ते काम अपूर्णच राहिलं होतं. मी असं आयुष्यात काय मोठं केलेलं आहे की माझं आत्मचरित्र मी लिहावं असं गणपतराव म्हणायचे. ते काम किसन माने यांच्या पुस्तकाच्या रूपाने आता पूर्ण झालेलं आहे. 

किसन माने यांच्या गणपतराव यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे की ते लेखक आहेत, प्राध्यापक आहेत आणि गणपतरावांचे कार्यकर्तेही आहेत. या तिहेरी गुणवत्तेमुळे हे चरित्र विश्लेषक, तर्कशुद्ध, तरीही मायेच्या ओलाव्यानं ओथंबलेलं आहे. मला गणपतरावांवर कधीतरी लिहायचं होतं. माने सरांनी निमित्त करून दिलं म्हणून त्यांचे आभार. अमरावती विद्यापीठाच्या उजळणी वर्गात माने सरांची पंधरा वर्षांपूर्वी माझी भेट झाली. आणि आम्ही कायमचे एकमेकांशी जोडल्या गेलो. त्यामुळे सांगोल्याला आलो आणि माने सरांना भेटलो नाही असं होणार नाही. म्हणून आवर्जून माने सरांना फोन केला. त्यांनीही आवर्जून बाबासाहेबांची भेट घडवून आणली. सांगोला भेटीतलं हेही एक महत्त्वाचं फलित म्हणायला हरकत नाही.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home