5.26.2021

७०% चा मंत्र

                             ७०% चा मंत्र

दोन वर्षापूर्वीची एक घटना : मी एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी कन्सल्टंट म्हणून काम पाहत होतो. ती एक अमेरिकन कंपनी होती व त्या कंपनीचा Chief Technology Officer (CTO) हा जर्मन माणूस होता. तो भारतातील काही बँकासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) सेवा पुरवायचा. तो जर्मनीमध्ये जन्मलेला, त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण जर्मनीमध्ये झाले. त्यानंतर त्याने पार्टटाईम नोकरी करून त्याचे इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले. नंतर तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत CTO म्हणून काम करू लागला. त्याच्यासोबत बऱ्याच वेळा संपर्क होत असल्याने बऱ्यापैकी ओळख झालेली. त्याचे घर ७०० ते ८०० स्क्वेअर फूट इतके लहान आहे, परंतु त्याचे वार्षिक वेतन तीन लाख डॉलर्स आहे. म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे तब्बल २ कोटी रुपये होतात. त्याची पत्नी पेशाने डॉक्टर आहे, तरीसुध्दा त्याचे घर हे लहान आहे. म्हणजे अमेरिकेत अशी घरे सर्वात लहान समजली जातात, तो साधी कार व आयफोनचे जुनेच मॉडेल वापरतो. मोजकेच कपडे, एक छोटीशी डायरी, मोजकेच ८-१० मित्र. कमीत कमी तणावात काम करणारा व कामानिमित्त जगभर फिरणारा असा हा माणूस. त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याने ७०% चा एक मंत्र सांगितला.

*महाग फोन* : आपल्या देशात बरेच जण स्टाईल व दिखावा करण्यासाठी महागडा आयफोन वापरतात. सध्याचे आयफोनचे नवीन मॉडेल हे एक लाखापर्यंत मिळते, परंतु त्यातले ७०% फंक्शन आपल्यासाठी निरुपयोगी असतात. आपल्याकडे कॉल्स व्यतिरिक्त फोनचा वापर हा सोशल मीडिया, गेम्स खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठीच केला जातो. ही कामे १० हजाराच्या स्वस्त फोनमध्येसुध्दा केली जाऊ शकतात, म्हणजे महागड्या फोनमध्ये ७०% फंक्शन व अॅप निरुपयोगी, काही कामाची नसतात.

*महागडे घर* : आजकाल मोठे मोठे बंगले बांधले जातात किंवा उच्चभ्रू वसाहतीत थ्री-बीएचके, फोर-बीएचके फ्लॅट किंवा ड्युप्लेक्स खरेदी करण्याचे बऱ्याच जणांना फॅड असते, परंतु या मोठमोठ्या घराचा केवळ ३०% उपयोग आपण करतो. जे लोक अशी घरे कर्ज काढून घेतात, ते आपला ७०% वेळ घराबाहेर घालवत असतात. त्यांना घराचे हफ्ते भरण्यासाठी अधिक काम करावे लागते.

*महागडी कार* : हल्ली बरेच लोक कार खरेदी करतात. मध्यमवर्गीयांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. कार घेतली तर महागडीच व नामवंत ब्रँडची घेतात. परंतु त्याचा वापर हा केवळ ३०% च होत असतो. मुंबईत तर लोक कार तर घेतात. परंतु सुरूवातीचे काही दिवस वगळता नंतर बसने किंवा लोकल ट्रेननेच जातात. कुटुंबियासोबत बाहेर प्रवास हा क्वचितच होतो. तेव्हा महागडी कार घेऊनही ती जवळ जवळ ७०% उपयोगात आणली जात नाही. तिचा वापर हा सरासरी ३०% च केला जातो.


*महागडे कपडे* : उच्च, आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून लोक ब्रँडेड रेडिमेड कपडे वापरू लागले आहेत. कपाट अशा ब्रॅंडेड महाग व विविध प्रकारच्या महागड्या कपड्यांनी भरलेले असते. परंतु हे कपडे खूप कमी वापरले जातात, बाकी ते कपाटातच पडून राहतात आपण घेतलेले महागडे कपडे हे बऱ्याचदा निरुपयोगी असतात, ते फक्त ठराविक वेळीच वापरतो नंतर ते कपाटात ठेवून देतो. लग्नातला सूट ९९% जण परत वापरतच नाहीत.

*मित्र/नातेवाईक* : प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक मित्र व नातेवाईक असतात, जे आपल्या आनंदाच्या क्षणी, कार्यक्रमांना आपल्या सोबत सहभागी होतात, परंतु यातले ७०% नातेवाईक हे निरुपयोगी असतात, कारण जेव्हा तुम्ही अडचणीत असता किंवा आर्थिक संकटात असता तेव्हा आपले मित्र व नातेवाईकांपैकी ७०% लोक हे आपल्यापासून दूर होतात, किंवा गरजेच्या वेळी मदत करत नाहीत. गर्दी पेक्षा दर्दी लोकांत रहा.

*कमाविलेला पैसा* : आपण मिळवलेल्या पैशांचेही तसेच असते. ज्या व्यक्तीजवळ प्रचंड संपत्ती असते, केवळ ३०% संपत्तीचाच त्याला उपयोग करत असतो. आपल्याकडे खूप संपत्ती असेल तर त्यापैकी ७०% संपत्ती अशीच पडून असते. त्यामुळे सतत डोक्यावर ओझे तयार होते व अतिप्रमाणात संपत्ती असूनही लोक सुखी नसतात. कुणासाठी व कशासाठी काम करतो व कमवितो हेच कळत नाही. पोरांसाठी कितीही कमवून ठेवा, तुम्ही मेल्यावर ते विकूनच खाणार. काही लोक रिटायर झाल्यावर बंगला बांधतात व दोन-तीन वर्षानी मरून जातात, शेवटी त्या बंगल्यात त्याचा हार घातलेला फोटो असतो. फोटो अडकवायला बंगला बांधला का?

*भांडी व साड्या*: आपल्या घरात अनेक विविध प्रकारची भांडी असतात, परंतु त्यापैकी ७०% भांडी ही विनावापरामुळे धूळ खात पडलेली असतात व दैनंदिन वापरासाठी ठरलेलीच ३०% भांडी आपण वापरतो. तसेच बायकांजवळ असलेल्या महागड्या साड्या त्या रोज नेसत नसतात. बऱ्याच ठिकाणी आधुनिकलाईफ स्टाईल म्हणून फार कमी बायका साड्या नेसत नाहीत. इतर कपडे वापरतात. आजकाल फक्त ठराविक कार्यक्रम समारंभात साड्या वापरल्या जातातत्यामुळे त्यांचा वापरही ७०%ही होत नाही. 

आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपण कळत नकळत ७०% पैसा, वेळ, संसाधने, वस्तूंवर वाया घालवत असतो. प्रत्येकाला खूप पैसा कमावण्याचे, महागड्या वस्तू खरेदी करण्याचे वेड असते, परंतु पाश्चात्य देशातील अनेक लोक आवश्यक तेवढ्याच गोष्टी बाळगतात आणि ते त्यांच्या बुद्धिमता विकास, अनुभव व जीवनातील खरा आनंद मिळविण्यावर अधिक भर देतात. यामुळे त्यांचे मन हे संतुलित असते व फारशा अवास्तव अपेक्षा नसल्याने ते नेहमी समाधानी असतात. त्यांच्याकडे अनावश्यक गोष्टींचे ओझे नसते.


0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home