4.24.2023

राजऋषी गणपतराव देशमुख ( Shri Ganpatraoji Deshmukh - MLA) लेखक कविवर्य इंद्रजित भालेराव



 राजऋषी गणपतराव देशमुख 

लेखक  कविवर्य इंद्रजित भालेराव 



सांगोल्याचा विषय निघाला की अपरिहार्यपणे गणपतराव देशमुख यांचं नाव समोर येतंच. योगायोगानं माझ्या आणि गणपतरावांच्या काही भेटीही झालेल्या आहेत. त्यांच्या ८८ व्या वाढदिवसाला मी पाहुणा म्हणून गेलो होतो. एकदा कुठल्यातरी कार्यक्रमाला सांगोल्याला गेलो तेव्हा सूतगिरणीच्या अतिथीगृहात थांबलो होतो, तेव्हाही गणपतरावांची भेट झाली होती. एकदा शिवाजीराव बंडगर या कवीमित्राच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला गेलो तेव्हाही गणपतरावांची भेट झाली होती. त्या कार्यक्रमाचे गणपतराव अध्यक्ष होते. 

पण ह्या भेटीगाठीपेक्षाही गणपतराव कितीतरी मनात रुजलेले होते ते त्यांच्या कर्तृत्वामुळं. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे एक अपवादभूत व्यक्तिमत्व. जो माणूस सतत ११ वेळा निवडणुका जिंकला, ५१ वर्ष विधानसभेत निष्कलंक राहिला, आपल्या वयोवृद्ध अनुभवाचा सर्वांना फायदा देत आला, ज्याच्या मतदारसंघात कापसाचं बोंडही पिकत नव्हतं त्या ठिकाणी आदर्श सूतगिरण्या चालवून एक चमत्कार घडवून आणला, ज्या माणसानं पंढरपूर वरून प्यायचं पाणी सांगोला मतदार संघात आणून गावागावात नेलं, आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, ज्या पंढरपुरातून पाणी आणलं त्या पंढरपुरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असताना सांगोल्यात आणि तालुक्यातल्या ८२ गावात मात्र गावोगाव आणि घरोघरी वेळेवर पाणी येत होतं, ज्या माणसानं वर्षानुवर्ष दुष्काळ परिषदा आणि पाणी परिषदा घेऊन जागृती केली, भयान दुष्काळी भागाला ओलिताखाली आणण्यासाठी अनेक प्रकल्प मार्गी लावले, त्यासाठी आंदोलन केली, धरणे धरले, शासनाचा पाठपुरावा केला, ज्या माणसानं आयुष्यात चुकूनही आपला शेतकरी कामगार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचा विचारही केला नाही, वेळोवेळी वेगवेगळ्या सरकारकडून मंत्रीपदाच्या ऑफर आल्या असतानाही ज्या माणसानं पक्षनिष्ठा ढळू दिली नाही, जो आयुष्यभर तत्वाशी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिला, ज्या पक्षाची वाताहात झालेली दिसत असतानाही तो पक्ष सोडून तो इतर पक्षात गेला नाही, काम तर एवढं निर्मळ ही भ्रष्टाचार चुकूनही मतदारसंघात कुठं होऊ दिला नाही, केला नाही, त्यामुळे विकासातून विकास, विकासातून विकास असेच फाटे फुटत गेले, सगळ्यात जास्त दुष्काळी असलेला हा भाग सगळ्यात सुकाळी करण्याचा या माणसानं आयुष्यभर जीवतोड प्रयत्न केला. ज्या माणसानं राजकारणात नेहमीच कोणाच्या वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हिताला प्राधान्य दिलं. असा हा एक आगळा वेगळा माणूस.

१९८० साली गणपतरावांनी शेतकरी सहकारी सुतगिरणी सुरू केली. गणपतरावांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पक्षाचं नावच होत शेतकरी कामगार पक्ष, त्यांच्या सूतगिरणीचं नाव होतं शेतकरी सहकारी सूतगिरणी, त्यांनी काढलेल्या शिक्षण संस्थेचं नाव आहे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण संस्था, म्हणजे गणपतरावांनी आपल्या प्रत्येक कामात शेतकरी हा केंद्रीभूत मानलेला आहे. प्रत्यक्ष तसं आचरण करून दाखवलेलं आहे. गणपतरावांनी शेतकरी सुतगिरणी काढली आणि तिचा नफा इतका झाला की त्यातून त्यांना शेतकरी सूतगिरणीच दुसरं युनिट काढावं लागलं. या दोन्ही गिरण्यांचा नफा वाढतच गेला. कारण तिथं भ्रष्टाचार करणारं कुणीही नव्हतं. त्यामुळं नफा सरळच शिल्लक राहत होता. त्यातून त्यांनी खास महिलांची म्हणून तिसरी सूतगिरणी काढली. अर्थात गणपतराव या सूतगिरण्यांमध्ये कुठेही कधीही पदावर नव्हते. त्यांनी सतत आपल्या कार्यकर्त्यांना मानाच्या जागा दिल्या. आणि आपल्या अनुभवी मार्गदर्शनाखाली या सूतगिरण्यांची प्रगती घडवून आणली

या सूतगिरण्यांमुळे सांगोल्याच्या दुष्काळी भागातून स्थलांतरित होणारी कुटुंबं आपल्याच गावी सुखानं आणि आनंदानं राहू लागली. या सूतगिरण्यांचा हा आदर्श कारभार पाहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्या सूतगिरण्यांची दखल घेतल्या गेली. जगभरातून या सूतगिरण्यांच्या सुताला मागणी आली. सूत निर्यात होऊ लागलं आणि देशाला परकीय चलन मिळू लागलं. या आदर्श कारभारामुळे सूतगिरण्यांना राष्ट्रीय पातळीवरील सहकाराची अनेक पारितोषिक मिळाली. सूतगिरण्यांचा नफा कामगारांमध्ये वाटप केल्यामुळं कामगारांना आपल्या गृहनिर्माण सोसायट्या तयार करता आल्या. सूतगिरण्यांच्या नफ्यातूनच गणपतरावांनी सामूहिक विवाहाच्या संकल्पना राबवल्या, दुष्काळाच्या काळात सूतगिरण्यांच्या आर्थिक नफ्यातून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या हा तर एक वेगळाच आदर्श होता. ह्या केवळ सूतगिरण्या नव्हत्या तर सांगोल्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा तो मानदंडच ठरला. या सूतगिरण्यासोबतच आमच्या मराठवाड्यात निघालेल्या सूतगिरण्यांचे नटबोल्टही शिल्लक नाहीत. तिथं या सूतगिरण्या दिमाखानं उभ्या असून सतत नफ्यातच आहेत. आता या व्यवसायाला राष्ट्रीय पातळीवर घरघर लागली असतानाही सांगोल्यातल्या सूतगिरण्या मात्र आदर्श पद्धतीनं सुरूच आहेत.

गणपतरावांनी शिक्षण संस्था काढली, पण सगळीकडं आपल्याच शिक्षण संस्थेची महाविद्यालये आणि शाळा काढल्या नाहीत. वेगवेगळ्या लोकांना जागोजाग संस्था काढायला लावून त्यांच्या शाळांना विनामूल्य परवाना मिळून दिला. दुसऱ्या कोणी महाविद्यालय काढलं तर त्यालाही सर्वतोपरी मदत केली. नाही तर चार-पाच महाविद्यालये आणि पाच-पन्नास शाळा काढून शिक्षण महर्षी होणं त्यांना सहज शक्य होतं. पण गणपतरावांनी तसं केलं नाही. सगळ्या अधिकारांचं सगळ्यांपर्यंत वितरण झालं पाहिजे हा लोकशाही शब्दाचा खरा अर्थ गणपतरावांना समजलेला होता.

गणपतरावांच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं निखळ मोठेपण महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांना मान्य होतं. त्यामुळं बहुतेक पक्ष त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करीत नसत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापर्यंत एकदाही त्यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही वाटायचं की गणपतरावाच्या विरोधात आपण उमेदवार उभा करू नये. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला तर त्यांच्या विरोधात शक्यतो इतर पक्ष उमेदवार देत नसत. त्यामुळे गणपतरावांचा सतत लढत झाली ती काँग्रेस पक्षाशी. आणि त्यातल्या त्यात शहाजीबाबू पाटील यांच्याशी. शहाजी बापूंनी त्यांच्या विरोधात सहा वेळा निवडणुका लढवल्या. त्यातल्या एकाच वेळी शहाजीबापू निवडून आले. गणपतरावांसारखा अनुभवी आणि आदर्श माणूस विधानसभेत असावा असं सगळ्याच पक्षांना वाटायचं. त्यांच्या अनुभवाचा फायदा विधानसभेला व्हावा म्हणून अनेकदा गणपतरावांचं मार्गदर्शन घेतलं जायचं.

या माणसाचं जगणं, या माणसाचा आदर्श मी नेहमीच माझ्या भाषणातून वेळोवेळी महाराष्ट्रभर सांगत आलेलो आहे. असाही एक माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात आहे याचं वेळोवेळी लोकांना आश्चर्य वाटत आलेलं आहे. अशा माणसाच्या गावी होणाऱ्या साहित्य संमेलनाला मी तीन दिवस होतो. पण आता गणपतराव देशमुख नव्हते. दोन वर्षांपूर्वी नुकतंच वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण चार महिन्यापूर्वीच त्यांच्या शिक्षण संस्थेतले एक प्रा. डॉ. किसनराव माने यांनी 'राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख' हा ग्रंथ लिहिला. तो त्यांनी मला भेट म्हणून पाठवला होता. त्यामुळे गणपतराव नसले तरी माने सरांना भेटूयात आणि गणपतरावांच्या आठवणींचा उजाळा देउयात असं मी ठरवलं. 

सरांनी दिलेलं पुस्तक मी केव्हाच वाचलं होतं. सरांना कळवायचं राहून गेलं होतं. म्हणून संमेलनाला आलो तेव्हा सरांना फोन केला. माने सर म्हणाले, सर आपण तर भेटूयातच पण गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनाही तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, तेव्हा आपण त्यांच्याकडंही जाऊयात. मलाही उत्सुकता होतीच. गणपतरावांच्या भेटी जरी बाहेर झाल्या असल्या तरी सांगोल्यात त्यांच्या घरी मला जाता आलं नव्हतं. म्हणून संमेलन संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेब देशमुख यांच्याकडे जायचं ठरवलं. त्याआधी माने सरांनी स्वतःच्या घरी नेलं. त्यांच्या नवीन आलिशान घरात त्यांनी आमचं स्वागत केलं. मग आम्ही बाबासाहेब देशमुख यांच्याकडं गेलो.  

गणपतराव असे तत्वनिष्ठ राजकारणी होते की त्यांनी आपण असेपर्यंत आपल्या नातलगांना, मुलांना कधी राजकारणात येऊ दिलं नाही. जो काही वाव द्यायचा तो आपल्या कार्यकर्त्यांनाच दिला पाहिजे म्हणून मुलांना त्यांचे त्यांचे व्यवसाय करायला लावून कार्यकर्त्यांना राजकारणात वाटा देण्याचं काम गणपतरावांनी आयुष्यभर केलं. पण गणपतरावांच्या निधनानंतर लोकाग्रहास्तव बाबासाहेब देशमुख यांना राजकारणात यावं लागलं. ते गणपतरावांचे नातू , एमबीबीएस डॉक्टर आहेत. पण लोकाग्रहास्तव त्यांना राजकारणात उतरावं लागलं. तोच साधेपणा, तीच मनमळावू वृत्ती, तीच सामान्य माणसासाठी झिजण्याची असोशी नातवात उतरलेली पाहून मला खूप आनंद वाटला. 

गणपतरावांचं घर, त्यांची बसण्याची जागा, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बसण्याच्या खुर्च्या, त्या बैठकीतलं ते साधेपण गणपतरावांची सतत आठवण करून देत होतं. गणपतरावांच्या किसनराव मानेंनी लिहिलेल्या चरित्राविषयी इथंच लिहिलं पाहिजे. गणपतराव देशमुख यांच्या कारकिर्दीला न्याय देणारं असं हे पहिलंच पुस्तक डॉ. माने यांनी लिहिलेलं आहे. गणपतराव कुणाला दाद देत नसत. त्यांना स्वतःची प्रसिद्धी नको असे. राजा कांदळकरांनी गणपतरावांना बोलतं करून त्यांचं आत्मकथन लिहिण्याचा, शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला  पण गणपतरावांनी त्यांना फारशी दाद दिली नाही. म्हणून ते काम अपूर्णच राहिलं होतं. मी असं आयुष्यात काय मोठं केलेलं आहे की माझं आत्मचरित्र मी लिहावं असं गणपतराव म्हणायचे. ते काम किसन माने यांच्या पुस्तकाच्या रूपाने आता पूर्ण झालेलं आहे. 

किसन माने यांच्या गणपतराव यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे की ते लेखक आहेत, प्राध्यापक आहेत आणि गणपतरावांचे कार्यकर्तेही आहेत. या तिहेरी गुणवत्तेमुळे हे चरित्र विश्लेषक, तर्कशुद्ध, तरीही मायेच्या ओलाव्यानं ओथंबलेलं आहे. मला गणपतरावांवर कधीतरी लिहायचं होतं. माने सरांनी निमित्त करून दिलं म्हणून त्यांचे आभार. अमरावती विद्यापीठाच्या उजळणी वर्गात माने सरांची पंधरा वर्षांपूर्वी माझी भेट झाली. आणि आम्ही कायमचे एकमेकांशी जोडल्या गेलो. त्यामुळे सांगोल्याला आलो आणि माने सरांना भेटलो नाही असं होणार नाही. म्हणून आवर्जून माने सरांना फोन केला. त्यांनीही आवर्जून बाबासाहेबांची भेट घडवून आणली. सांगोला भेटीतलं हेही एक महत्त्वाचं फलित म्हणायला हरकत नाही.

4.22.2023

उष्माघात : कारणे आणि घ्यावयाची काळजी प्रा. डॉ. विधिन कांबळे

                      उष्माघात : कारणे आणि घ्यावयाची काळजी

प्रा. डॉ. विधिन कांबळे

नुकत्याच खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा प्रसंगी  अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. व  यामध्ये १३  जणांचा मृत्यू झाला आणि तब्बल ६०० ते ७००  जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे.  त्यामुळे उष्माघात या गंभीर समस्या आहे यांची जाणीव आपणा सर्वांना झाली आहे.  सामान्यपणे दरवर्षी अशा  घटना विविध ठिकाणी घडत असतात. परंतु खारघरच्या घटनेने ही समस्या गंभीर असल्याचे दिसून येते.



वातावरणातील जास्त तापमान मानवी शरीर सहन करू शकत नसेल तेव्हा उष्माघात होत असतो.उष्माघात ही एक अशी स्थिती आहे जी तुमचे शरीर जास्त तापते तेव्हा उद्भवते, सामान्यत: गरम हवामानात दीर्घकाळापर्यंत संपर्क किंवा शारीरिक प्रक्रिये मुले आपल्या शरीराचे तापमान १०४ अंश फॅरेनहाइट (४० अंश सेल्सिअस) किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास उष्माघात, डोके दुखापतीचा सर्वात घातक ठरू शकते.  उष्माघात झाल्यास संबंधित व्यक्तिला भरपूर घाम येतो. असंबंध बोलते.  त्वचा कोरडी किंवा गरम होते, मळमळ, उलट्या, हृदय गती वाढते, श्वसनक्रिया वाढते, जास्त तहान लागते, डोकेदुखी स्नायू पेटके येतात, आणि शुद्ध हरपते.  उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास उष्माघात तुमच्या मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंना झपाट्याने हानी पोहोचवू शकतो. उपचार घेण्यासाठी  जितका जास्त वेळ प्रतीक्षा कराल तितके जास्त नुकसान होईल, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत किंवा मृत्यूची शक्यता वाढते. तेव्हा लवकरात लवकर सदर व्यक्तिला वैद्यकीय उपचार देणे अत्यंत महत्वाचे आहे.

आपल्या शरीराच्या तापमानाचे नियंत्रण मुख्यतः मोठ्या मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागाच्या खालील भागाकडून केले जाते. शरीराचे तापमान जर अगदी कमी असेल, तर अधोथॅलॅमस (Hypothalamus) शरीरातील स्नायू उद्दीपित करून कापरे उत्पन्न करतो व त्यामुळे जास्त उष्णता उत्पन्न होते. शरीर जर बरेच गरम झाले असेल, तर अधोथॅलॅमस स्वेद ग्रंथींना उत्तेजित करून त्यांना जास्त कार्यप्रवण करतो यामुळे घाम येऊन त्याच्या बाष्पीभवनाने बरीच उष्णता बाहेर जाते. त्याचप्रमाणे त्वचेला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन त्वचेला रक्ताचा जास्त पुरवठा होतो व रक्तामधूम जास्त उष्णता बाहेर पडते. 

मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६° ते ३७·° से. एवढे असते. काही व्यक्तींमध्ये ते नेहमीच ३६° से. असू शकते. तापमानात दैनंदिन बदलही होतात. रात्री २ ते सकाळी ६ या दरम्यान ते सर्वांत कमी असते, तर सायंकाळी ५ ते ८ या दरम्यान ते सर्वोच्च असते. या फरकाचा संबंध शारिरिक हालचालींशी आणि चयापचयाशी असतो. उन्हाळ्यात हवेचे तापमान ३७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ लागते, तेव्हा घामाच्या साह्याने शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्याचा प्रयत्न होतो.

उष्णतेच्या लाटांची स्थिती असताना किंवा हवेचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असताना शारीरिक कष्टाची कामे केल्यास, शरीरातील पाण्याची पातळी वेगाने कमी होते. अशा स्थितीत शरीराचे तापमान वाढू लागते आणि उष्माघाताचा त्रास सुरू होतो. दुसऱ्या स्थितीत, हवेचे तापमान ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त आणि सापेक्ष आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर हवेतील बाष्पामुळे शरीरातून घाम येण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी, शरीराचे तापमान वाढत जाऊन उष्माघाताचा त्रास होतो. थोडक्यात, उष्माघाताचा त्रास होण्यास फक्त वाढलेले तापमानच नाही, तर हवेतील आर्द्रताही कारणीभूत ठरते.

उष्माघात टाळण्यासाठी खालील उपाययोजना व काळजी घेणे जरूरी ठरते.




भरपूर पाणी अथवा द्रव पदार्थ जसे की ओ आर एस, लिंबू सरबत, ताक, मट्टा, दही फळांचा रस, आदिचे सेवन करणे. जास्त पाणी पिणे कधीही चांगले, मात्र अतिशय थंड पाणी पिणे टाळा. सैल-फिटिंग असलेले हलके कपडे घाला, फिकट रंगाचे कपडे वापरा, हाफ बाह्यांचे कपडे टाळा. डोक्यावर नेहमी पांढरा रूमाल अथवा टोपी वापरा.उष्णता वाढल्यास तोंडालाही रूमाल बांधा, नाक, कान पांढऱ्या रूमालने झाका.  घराबाहेर पडताना उषणतेचा डोळयांना शरीराला त्रास होऊ नये म्हणून गाॅगल टोपी रूमाल किंवा छत्री सोबत ठेवावी.एसीतून लगेच उन्हात, किंवा उन्हातून लगेच एसीत जाऊ नका१५ ते २०  मिनिटं सावलीत काढल्यानंतर उन्हात किंवा उन्हातून सावलीत उभं राहिल्यानंतर एसी किंवा कुलरच्या हवेत जा. उन्हात जाणे टाळा. बाहेर जाताना बाटलीत पाणी घेऊन जा, पाणी पित राहा. आपल्या बाळाला किंवा पाळीव प्राण्याला कारमध्ये कधीही सोडू नका.


काळजी घ्या सुरक्षित रहा ..!!!

  

Labels: