6.07.2023

डार्विनच्या सिद्धान्ताची पुन्हा एकदा ओळख (Darwins Theory of Evolution)

 अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांतच  वगळला : डार्विनच्या सिद्धान्ताची पुन्हा एकदा ओळख 


मानव व प्राणी यांची उत्क्राती विषयी माणसाच्या मनात नेहमीच कुतूहल व संभ्रम आहे..  निसर्ग निर्मितीबरोबरच पृथ्वीतलावर  प्राणी वनस्पतीची व सर्व जीवांची निर्मिती व उत्पत्ती परमेश्वरानेच केली आहे असा दृढ समज जगातील अखंड जगातील विविध जाती धर्मात आढळून येते.  परंतु १९०० व्या शतकात डार्विन नावाच्या  प्रचंड विद्वान आणि जैवविविधतेच्यां   अभ्यासकाने अनेक निष्कर्षातून मानव व प्राणी यांच्या उत्क्रांतीचे रहस्य जगासमोर मांडले त्यालाच आपण आज उत्क्रांती म्हणतो. व सर चार्ल्स डार्विन यांना उत्क्रातिवादाचा जनक म्हणून ओळखले जाते. 

चार्ल्स डार्विन या वैज्ञानिकाने एकोणिसाव्या शतकात प्रचंड मेहनतीने संशोधन करून जीवसृष्टीच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दलचे सिद्धान्त मांडले. बायबलमधील जीवसृष्टी आणि मानवाच्या उत्पत्तीच्या संदर्भातील ‘जेनेसिस’च्या संकल्पनेला डार्विन यांनी छेद दिला. बाविसाव्या वर्षी, म्हणजे १८३१मध्ये त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात पुरेसा वेळ घालवता येईल, अशी संधी चालून आली. समुद्राच्या प्रवाहांचा, खोलीचा अभ्यास करणे, युरोपीय आरमाराच्या गलबतांचा प्रवासमार्ग ठरवण्यासाठी सागरी मार्गाचे नकाशे तयार करणे या व अशा कामांसाठी सागर सफरींचे वारंवार आयोजन करण्यात येत होते. ‘एचएमएस बीगल’ नावाच्या जहाजाची अशीच एक मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेसाठी सागरी किनाऱ्यांवरील जीवसृष्टीचा, जीविधतेचा अभ्यास करणारा, त्यात रस असणारा एखादा तरुण निसर्ग अभ्यासक त्यांना हवा होता. तरुण चार्ल्सला हे कळल्यावर, त्याने वेळ वाया न दवडता खूप धडपड करून या मोहिमेत प्रवेश मिळवला.

सन १८३१मध्ये ब्रिटनच्या किनाऱ्यावर जहाजावर चढलेले चार्ल्स डार्विन आणि १८३६मध्ये ब्रिटनच्या किनाऱ्यावर उतरलेले चार्ल्स डार्विन यांच्या जीवसृष्टी व जीविधतेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला होता. या प्रवासात त्यांनी प्रत्येक ठिकाणी, दर मुक्कामात जीवसृष्टीचा सखोल अभ्यास केला. देवाने एकाच वेळी एकाच ठिकाणी काही तरी विशिष्ट शरीररचना असलेले जीव तयार केले आणि ते त्याच ठिकाणी काहीही बदल न होता टिकून राहिले, या त्यांच्या समजाला तडा गेला. ते या अफाट नैसर्गिक सृष्टीकडे वेगळ्या, नव्या नजरेने पाहू लागले. या सखोल निरीक्षणातून जीवसृष्टीच्या निर्मितीचे कोडे उलगडण्याची प्रक्रिया त्यांच्या डोक्यात हळूहळू चालू झाली. जीवसृष्टीतील विविध जिवांचा एकच समान पूर्वज असणार, असे त्यांना सर्व निरीक्षणांवरून वाटले. आश्चर्य म्हणजे १९२८मध्ये, म्हणजे डार्विन यांच्या मृत्यूनंतर जवळपास ४६ वर्षांनी ओपारीन आणि हाल्डेन या जोडगोळीने साधारण साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी जैविक रसायनांच्या अभिक्रियेतून सजीवांच्या शरीरातील मूलभूत रासायनिक घटक असलेला पेशीद्रव्याचा एक ‘गोळा’ निर्माण झाला; हा गोळा सजीवांचा मूळ जनक असला पाहिजे, असा सिद्धान्त मांडला. पुढे स्टेनले आणि मिलर या शास्त्रज्ञांनी हा सिद्धान्त प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवला. डार्विन यांच्या विचारांमध्ये डोकावणारा हाच तो सामायिक, समान पूर्वज. पुढे या सामायिक पूर्वजापासून लाखो शाखा-उपशाखा असलेला जीवसृष्टीचा महावटवृक्ष निर्माण झाला. एकूणच जीवसृष्टी अतिशय संथ; पण सातत्याने चालू असलेल्या परिवर्तनातून, म्हणजेच उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण झाली आहे, हे डार्विन यांच्या लक्षात येऊ लागले. डार्विन यांची निरीक्षणशक्ती अफाट आणि बुद्धिमत्ता विलक्षण होती. त्यांनी गोळा केलेल्या प्राणी व वनस्पतींच्या नमुन्यांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून, ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पिसीज’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी सर्व सजीव प्रजाती एकाच समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने, लाखो वर्षांच्या कालखंडात नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार विकसित झाल्या आहेत आणि होत आहेत, असा निष्कर्ष मांडला. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर युरोपातील धर्ममार्तंड खवळून उठले. याचे कारण, ‘जेनेसिस’मधील सर्व संकल्पना या ग्रंथामुळे बाद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे डार्विन यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला. 

या ग्रंथानंतर मानवाच्या उत्क्रांतीची शास्त्रशुद्ध कहाणी सांगणारा ‘द डिसेंट ऑफ मॅन’ हा डार्विन यांचा दुसरा अत्यंत मौल्यवान ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांनी मानवाची उत्क्रांती कशी झाली असावी, याचे तर्कसंगत, शास्त्रीय आधारावर वर्णन केले. आजच्या काळातील वानर-माकड, गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि माणूस हे सर्व प्राणी त्यांच्या विशिष्ट लक्षणांमुळे वर्गीकरण शास्त्राच्या नियमानुसार ‘प्रायमेट’ या एकाच गटात मोडतात. पुढे वानर-माकड यांचा वेगळा गट झाला, तर गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि मानवाचा आदिपूर्वज यांचा वेगळा गट बनला. या गटाला ‘कपी’ किंवा ‘एप’ या नावाने ओळखले जाते. या सर्वांचा एकच सामायिक, समान पूर्वज होता. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या ओघात एकाच पूर्वजापासून या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होत गेल्या. यात पुढे साधारण ७० लाख वर्षांपूर्वी चिंपांझी आणि मानव यांचा समान पूर्वज अवतरला. त्याला नाव दिले गेले ‘साहेलान्थ्रोपस’. हा आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात वास्तव्य करत होता. या प्राण्यापासून ४० लाख वर्षांपूर्वी पुढे दोन वंश निर्माण झाले. एक म्हणजे, चिंपांझी आणि दुसरा मानववंशाचा खरा मूळपुरुष ‘ऑस्ट्रॅलोपिथेकस’. यांची पुढील लक्षावधी वर्षे उत्क्रांती होत गेली. त्यांच्या मेंदूच्या आकारमानात बदल होत गेले. बुद्धी अधिक प्रगल्भ होत गेली आणि साधारण ५० हजार वर्षांपूर्वी आजच्या मानवाची, म्हणजे आपली, म्हणजेच ‘होमो सेपियन्स’ या प्रजातीची उत्पत्ती झाली. यावरून हे सिद्ध होते, की माणूस आणि माकड यांचे मूळ पूर्वज समान असले, तरी माकडापासून माणसाची उत्पत्ती झालेली नाही; किंबहुना कपी कुळातील गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि माणूस या सर्वांमध्ये काही मूलभूत लक्षणे सारखी असली, तरी त्यांच्यात कमालीचे वैविध्य आहे. त्यातल्या त्यात चिंपांझी आपल्याला अधिक जवळचा आहे. माणूस आणि चिंपांझी यांची ९८ टक्के जनुके (जीन्स) एकसारखी आहेत.


या सर्व बाबींचा विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, की माणूस हा माकडापासून उत्क्रांत झालेला नाही. वास्तवात डार्विन यांनीही हे कधी म्हटले नव्हते. दुसरे म्हणजे, पृथ्वीवरील सजीवांची उत्पत्ती विविध धर्मग्रंथांमध्ये उद्धृत केल्याप्रमाणे कोण्या एकाने केली नसून, ४५० कोटी वर्षांच्या इतिहासात पृथ्वीच्या अवाढव्य रंगमंचावर सातत्याने सुरू असलेल्या उत्क्रांतीच्या महानाट्यातील अगणित अंकांच्या आणि प्रवेशांच्या माध्यमातून साकारली आहे. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीसंबंधी एवढे धडधडीत पुरावे असलेला सिद्धान्त अभ्यासक्रमांतून वगळण्याचा अट्टहास का केला जातो आहे, हे समजत नाही. ‘एनसीईआरटी’तर्फे अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात हा सिद्धान्त समाविष्ट केला जाईल. यावर एक युक्तिवाद असा आहे, की दहावीनंतर सगळेच विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेत नाहीत. विज्ञानाव्यातिरिक्त अन्य शाखाही आहेत. अशा विद्यार्थ्यांना डार्विनचा उत्क्रांतिवाद कसा कळणार? असे विद्यार्थी भविष्यात कदाचित धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या मानव आणि अन्य सजीव यांच्या उत्पत्तीच्या व उत्क्रांतीच्या चुकीच्या, अशास्त्रीय, अंधश्रद्धा रुजवणाऱ्या, भ्रामक संकल्पना शिकतील. त्यांना डार्विन कधी भेटणारच नाहीत. संबंधित अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा आणि नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना डार्विन यांच्या मूलभूत उत्क्रांती सिद्धान्तांची ओळख करून द्यावी, एवढीच अपेक्षा.

Whtasapp source  

(लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत.) 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home