8.21.2019

कधी कधी पैसा खूप महत्त्वाचा - प्रमोद खरात इचलकरंजी यांचा सुंदर लेख आहे तसा

मागच्या आठवड्यात कॅश मध्ये काम करत होतो.. साधारण 60-65 वर्षांचे एक आजोबा काऊंटर समोर आले आणि त्यांनी हात जोडून मला नमस्कार केला, मी ही त्यांना नमस्कार म्हणालो..त्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव होते. मनातील शंका विचारू की नको अशा द्विधा अवस्थेत वाटले मला ते.. त्यांच्या प्रश्नाला, उत्तरादाखल मी नाही म्हणालो तर काय होईल? या विवंचनेत ते असतानाच, जरा कचरतच, एकदम हळू आवाजात मला म्हणाले, साहेब एक विचारू का? मी म्हणालो, हा विचारा ना आजोबा. तर ते म्हणाले की साहेब, 700 रुपये निघतील काय माझ्या खात्यातून? मी त्यांचं अकाऊंट चेक केलं, तर त्यांच्या अकाऊंट मध्ये 702 रुपये होते. मी म्हणालो, आजोबा, तुमच्या खात्यात 702 रुपये आहेत, तर ते म्हणाले की, नाही म्हणजे, खात्यात 100 रुपये तरी ठेवायला लागत्यात नव्हं? मी म्हणालो हो, तेव्हढे तरी ठेवायला लागतील.थोडंसं अस्वस्थ झालेल्या त्या आजोबांनी परत एक आवंढा गिळून मला विचारलं, की साहेब एव्हढ्या टायमाला सगळच पैशे देता काय? गरज हाय ओ पैश्यांची.. पुरात सगळं वाहून गेलयं.

अस्वस्थता, नैराश्य, helplessness यामुळे झालेल्या त्यांच्या केविलवाण्या अवस्थेतील त्यांचे हे बोल मनाला खूप खोलवर लागले.. एखाद्यासाठी 100 रुपये इतके इतके इतके महत्त्वाचे असू शकतात याची जाणीव मलाही खूप अस्वस्थ करून गेली.. आपण साधा चहा जरी प्यायला गेलो तरी 100 रुपयांचे बिल ही आपण अगदी सहज pay करतो आणि त्याचं आपल्याला विशेष असं काहीच वाटत नाही.. पण इथे एक माणूस 100 रुपये, जे की त्यांचेच आहेत, ते मिळावेत म्हणून विनंती करतोय हे खूप हृदयद्रावक होतं.  मी म्हणालो, की आजोबा द्या तुम्ही स्लिप भरून, मी देतो तुम्हाला तुमचे 700 रुपये.. त्या आजोबांच्या चेहर्‍यावर जग जिंकल्याचा फील आला.. काय होतं त्या 100 रुपयांमध्ये हे त्यांनाच माहित.. पण माझा पहिला पगार झाल्यावर, जो की 19 हजारांपेक्षा जास्त होता, त्यावेळी मला जेव्हढा आनंद झाला होता, त्याच्यापेक्षा जास्त आनंद, त्या आजोबांना त्यांचे Extra चे 100 रुपये मिळणार म्हंटल्यावर झाल्याचा मला त्यांच्या चेहर्‍यावर दिसला. पैसे घेतल्यावर, त्या छोट्याश्या खिडकीतून त्यांनी त्यांचा हात आत घालून माझ्या हातात हात देऊन, "लई उपकार झाले साहेब तुमचे" असं म्हणत, खूप मोठं काहीतरी मिळाल्यासारखं ते आजोबा निघून गेले.

"लई उपकार झाले तुमचे साहेब" म्हणणारे ते आजोबाच नकळत माझ्यावर किती उपकार करून गेले होते हे त्यांनाही ठाऊक नसेल..  कितीही अस्वस्थ असलो तरी रागाने आणि चढ्या आवाजात न बोलता शांततेने आणि प्रेमाने बोलण्याची कला शिकवून गेले.. 700 रुपयांपैकी 600 मिळाले तरी त्याच्यामध्ये adjust कसे करायचे आणि आपल्याला असणार्‍या गरजांची priority असावी हे ही शिकवून गेले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनेक Financial Management ची पुस्तके वाचूनही जेव्हढी पैशांची किम्मत कळली नसती, तेव्हढी पैश्यांची किम्मत त्या आजोबांनी मला अवघ्या काही मिनिटांत शिकवली.

उपकार केले म्हणत, पण उपकार करून, समाधानकारकपणे आणि नकळत खूप काही शिकवून चाललेल्या, त्या सदरा, विजार आणि गांधी टोपी परिधान केलेल्या आजोबांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात माझ्या चेहर्‍यावर ही छोटीशी स्माईल आली, आणि "काका द्या इकडे ती स्लिप" असं पुढच्या कस्टमरना म्हणत माझं काम परत चालू झालं.

Those 100 rs.. Really really matters a lot to him..

*प्रमोद खरात इचलकरंजी*
*9689387700*

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home