6.05.2021

दहा मिनिटाची अवॉर्ड विनिंग फिल्म

 दहा मिनिटाची अवॉर्ड विनिंग फिल्म आणि तुम्ही आम्ही ??

 :Author - धनंजय देशपांडे 

-का मल्टीप्लेक्स  सिनेमागृहाचे उदघाटन होते. जास्तीत जास्त लोकांनी तिथे यावे म्हणून तो सिनेमागृहाचा मालक एक योजना जाहीर करतो. 

"आमच्या थियेटरमध्ये प्रत्येक सिनेमा सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटांची एक अतिशय मानांकित असे अवॉर्ड मिळालेली शॉर्टफल्म मोफत दाखवण्यात येईल"

विशेष म्हणजे "त्या" फिल्मचा तोवर सगळीकडे गवगवा झालेला असतोच पण नेमकी स्टोरी काय आहे हे कुणाला कळलेलं नसत. ती फिल्म पाहायला मिळणार या आशेने लोक मोठ्या संख्येने गर्दी करून आले. थेटर हाऊसफुल्ल झालं. थियेटरमध्ये अंधार झाला अन दहाच मिनिटाची "ती" फिल्म सुरु झाली. समोर पडद्यावर सुरुवातीला फक्त एका छताचा सिन दिसू लागला. प्रेक्षकांना उत्सुकता वाढली. मात्र दोन मिनिटे झाली तरी पडद्यावरील तो छताचा सिन काही संपायला तयार नाही. जणू शूटिंग करणाऱ्याने एका जागी कॅमेरा ठेवून तो निघून गेला असावा. 

दोन मिनिट संपल्यावर लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. तिकडे अजून दोन मिनिटे तशीच गेली. तोच छताचा सिन कायम !चार मिनिटे संपल्यावर लोकांच्या कुजबुजीचे रूपांतर एकमेकांशी थोड्या मोठ्या आवाजात शंका विचारणे सुरु झाले. की, हि अशी कशी  फिल्म.....  म्हणून !

अजून दोन मिनिटे अशीच गेली, आणि सहा मिनिट झाली तरी तिकडे पडद्यावर सिन कायमच !! आता मात्र लोक वैतागले. चढ्या आवाजात विचारू लागले की, "कोण आहेत ते परीक्षक ज्यांनी या फिल्मला अवॉर्ड दिले?" वगैरे वगैरे !! थोडा धिंगाणाही वाढला. 

अजून दोन मिनिटे अशीच गेली, आणि आठ  मिनिट झाली तरी तिकडे पडद्यावर सिन कायमच !! 

आता मात्र लोकांचा संयम संपतो. सुरुवातीच्या निराशेचे रूपांतर आता प्रचंड रागात झालेले. सगळेच जणू "फसवलं आम्हाला" या मोडवर जाऊन पॅनिक झालेले. एकदोघांनी तर हातातले वेफर्सचे पुडेही पडद्यावर फेकून राग व्यक्त केला. ते पाहून अजून एकदोन लोकांनी त्यांच्याकडील पाण्याच्या बाटल्या फेकल्या. 

आणि अचानक समोरच्या पडद्यावरील सिन बदलणे सुरु झाले. छतावरून कॅमेरा आता जमिनीकडे आला. आणि प्रेक्षकांना समोर दिसत काय?

तर ती एक हॉस्पिटलची रूम असते. "ते" छत त्या रूम चे असते. 

खाली बेडवर एक पेशन्ट पडलेला. हातापायाला बँडेज, शेजारी नर्स उभी. ती काहीतरी इंजेक्शन देतेय. इतकंच दिसत. 

प्रेक्षक एकदम चिडीचूप होतात. 

आणि पडद्यावर एकेक ओळी उमटू लागतात. 

हा जो पेशन्ट आहे, तो मणक्याचा भाग तुटल्यामुळे इथं गेले सहा महिने झाले पडून आहे.

त्याचा हा मणका दुरुस्त होईल की नाही, तो माणूस पुन्हा पहिल्यासारखा उभा राहील कि नाही? हे डॉक्टरांनाही माहित नाही !

गेले सहा महिने तो पेशन्ट फक्त छत पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाहीय.*

सहा महिने म्हणजे एकशे ऐंशी दिवस झाले तो फक्त छत पाहतोय. दिवस अन रात्र !*

आणि तुम्हाला फक्त आठ मिनिटे पण ते छत पाहण्याचा स्टॅमिना नाहीय.*

तुम्ही पॅनिक झालात फक्त आठ मिनिटात.*

मग विचार करा त्या पेशंटचे काय होत असेल?*

आणि या ओळीवर ती दहा मिनिटची फिल्म संपते. शेवटी the end ऐवजी "think" इतकेच शब्द येतात. 

प्रेक्षक सुन्न होतात. 

ती फिल्म आणि माझी हि पोस्टमधील कथा इथंच संपलीय !

डीडी क्लास : आपल्यापैकी अनेकांचे आज असेच त्या प्रेक्षकासारखे झाले आहे. लॉक डाऊन मुळे सुरुवातीला केलेली अनेक गमतीदार व्हिडीओ. रेसिपी वगैरे संपली (सुरुवातीची हीच ती दोन मिनिटे) मात्र नंतर हळूहळू लॉकडाऊन वाढतोय तसतसे निराशा,  चिडचिड, रागराग वाढतोय. की आमच्याच नाशिबात असं का ? त्यातून अनेकजण पॅनिक होतं आहेत. तर मंडळी अशावेळी जी माणसे सध्या आयसोलेशन सेंटर मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. एकेक श्वासाच्या ऑक्सिजन साठी धावपळ सुरु आहे. ते आठवून पहा. मग त्या दहा मिनिटाच्या शॉर्ट फिल्म मधील तो पेशन्ट आपोआप तुम्हाला आठवेल! छताकडे पाहत बसण्याशिवाय हाती काहीही नसलेले हे पेशन्ट आहेत. 

आणि आता स्वतःकडे पहा. किमान डोक्यावर घराचे छत आहे. अन तेच फक्त पाहायचं नशिबात नाही तर घरभर तरी फिरू शकताय. उंबऱ्याच्या आत का होईना मनासारखं जगू शकताय. भले पूर्वीसारखं गुलाबजाम नसतील आता पण पिठलं भाकरी तरी दोन वेळची मिळतेय न ? तुमची माणसे तुमच्या भोवती आहेत न ? मग विचार करा, तुम्ही किती नशीबवान आहात. 

अजून तितकं तर सोसावं लागलेलं नाही जे एकाला सोसावं लागलं. त्याचे उदाहरण देतो. संपूर्ण रसिकांवर राज्य करणारा शब्दशः करोडपती असलेला एक माणूस वयाच्या ५७ व्या वर्षी कंगाल होतो. एकशेवीस कोटीचे नुकसान होऊन दिवाळखोरी जाहीर करावी लागते. पण तरी तो हिंमत सोडत नाही. पुन्हा उठून उभा राहतो अन नुकसान भरून काढतोच पण नंतर इतकं कमवतो की जणू आभाळाइतकं !! तो माणूस म्हणजे अमिताभ बच्चन !!

वेळ कशीही व कधीही येऊ शकते. आपण हिंमत सोडता कामा नये. हेच खरं ! वयाच्या ४५ वर्षी (म्हणजे इतक्या उशिरा) करियर सुरु केलेला बोमन इराणी आज टॉपवर आहेच की !

तेव्हा मंडळी, इतरांपेक्षा आपण खूप नशीबवान आहोत असं समजा. आणि आताचा वेळ हा पुढील आयुष्यात काय करता येईल त्यावर विचार करण्यात सत्कारणी लावा. 

हे खरं न ? तर मंडळी कदाचित तुमच्या अवतीभोवती तुम्हाला अशी पॅनिक माणसे दिसतीलही ! तर त्यांच्यापर्यंत कृपया हि पोस्ट पोचवा. त्यांना नक्की फरक पडेल, उभारी येईल ! हि मला खात्री आहे.

Source -Sangolatecher   Whatsapp 

 :Author - धनंजय देशपांडे 

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home