8.27.2022

विंचवाचं विष 80 कोटी रुपयांना 1 लीटर,


विंचवाचं विष 80 कोटी रुपयांना 1 लीटर, पण या विषाचं करतात तरी काय?

सर्पदंश हा प्राणघातक ठरतो हे आपल्याला माहितीये. पण एखाद्याला विंचू दंश झाला तर त्याची जीवघेणी तळमळ होते. विंचवाचा डंख हा अनेकदा प्राणावरही बेतू शकतो.

पण एवढ्याशा प्राण्याच्या नांगीत असलेलं विष हे जसं प्राणघातक असतं, तसंच ते कोट्यवधी किमतीचंही असतं हे तुम्हाला माहितीये?

टर्कीएमधल्या एका प्रयोगशाळेत दिवसाला विंचवाचं दोन ग्रॅम विष जमा केलं जातं. या प्रयोगशाळेतल्या विंचवांना बॉक्सबाहेर काढल्यानंतर प्रयोगशाळेतले कर्मचारी विंचू विषाचा छोटा थेंब सोडेपर्यंत वाट पाहतात. विषाचा हा थेंब गोठवला जातो, त्याची पावडर केली जाते आणि मग ती विकली जाते.

आपल्याकडे जसं शेळी पालन, कुक्कुटपालन करतात त्याचप्रमाणे मेदिन ओरॅनलेर हे विंचू पालन करतात. आपल्या या विंचू पालनाबद्दल बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "सध्या आमच्याकडे 20 हजार विंचू आहेत. आम्ही त्यांना योग्य प्रकारे खायला घालतो, त्यांची काळजी घेतो, त्यांचं प्रजननही करतो. त्यांच्यापासून मिळालेलं विष हे गोठवून ठेवतो. नंतर त्याचीच पावडर करतो आणि ती युरोपमध्ये विकतो."

साप खरंच डूख धरून बदला घेतो का? साप चावल्यानंतर तातडीने काय करायचं?
एका विंचवाच्या नांगीत केवळ 2 मिलीग्रॅम इतकंच विष असते. "300 ते 400 विंचवांपासून एक ग्रॅम विष मिळतं," मेदिन सांगतात.

जर ते हे विष विकतात, तर पुढचा स्वाभाविक प्रश्न आहे- त्याची किंमत काय आहे? ते सांगतात की, ते विंचवाचं एक लीटर विष हे एक कोटी डॉलर्सना विकतात. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 80 कोटी रुपये.

वैद्यकीय उपचारांमध्ये विंचवाच्या विषाचा वापर
मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या विंचवांपासून काढण्यात आलेल्या विषामध्ये मार्गाटॉक्सिन नावाचा एक घटक असतो. हा घटक रक्तवाहिन्यांमध्ये नवीन पेशी तयार करायला मदत करतो आणि तो हृदयाच्या बायपास सर्जरीमध्ये वापरला जातो.

हे विंचू पाच सेंटीमीटर ते आठ सेंटीमीटरपर्यंत वाढतात. त्यांचं विष हे जीवघेणं नसलं तरी या विंचवाच्या दंशामुळे वेदना होते तसंच सूज येते आणि दंश झालेल्या जागेवर खाजही सुटते.

युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधील प्राध्यापक आणि विंचू दंशाचे अभ्यासक डेव्हिड बीच सांगतात की, हे विष अविश्वसनीयरित्या परिणामकारक आहे.

योग्य तो परिणाम साधण्यासाठी आपल्याला अत्यंत कमी प्रमाणात याची गरज पडत असल्याचंही ते सांगतात.
शास्त्रज्ञ सांगतात की, मार्गाटॉक्सिन हे सहसा अशा औषधाच्या स्वरुपात वापरतात, जे गिळता येईल, श्वासावाटे शरीरात घेता येईल किंवा इंजेक्ट करता येईल. पण ते पुढे हेही म्हणतात की, हा घटक हृदयविकारावर उपचार करताना शिरेवर स्प्रे म्हणून वापरला जाऊ शकतो.

विंचवाच्या विषाचा हृदयविकारावरील उपचारासंबंधीचा हा अभ्यास तीन संस्थांच्या संयुक्तिक आर्थिक सहकार्यातून केला जात आहे. ब्रिटीश हार्ट फांउडेशन, द वेलकम ट्रस्ट आणि ब्रिटीश मेडिकल रिसर्च कौन्सिल या त्या तीन संस्था आहेत.

एखादा घटक माणसासाठी नैसर्गिकरित्या घातक असला तरी त्याचा उपचारांसाठी कसा उपयोग होऊ शकतो याचं हे चांगलं उदाहरण असल्याचं ब्रिटीश हार्ट फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक प्रोफेसर पीटर वेइसबर्ग सांगतात.

विंचवाच्या दंशाचे वैद्यकीय उपयोग कसे होऊ शकतात यावर गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे.

सध्याच्या घडीला विंचवाचं विष हे एक व्यावसायिक गोष्ट बनली आहे आणि ती कोट्यवधींमध्ये विकली जाते. केवळ वैद्यकीय उपचारांमध्येच नाही तर कॉस्मेटिक्स, वेदनाशामक तसंच रोगप्रतिकारकक्षमतेशी संबंधित औषधांसाठीही विंचवाचं विष वापरलं जातं.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये 2020 साली प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामधून असं म्हटलं गेलं होतं की, विषरोधक औषधांच्या निर्मितीमध्येही विंचवाचं विष वापरलं जाऊ शकतं.


8.16.2022

माण नदीचे मराठ्यांच्या इतिहासात योगदान* लेखक – गोपाळराव देशमुख(पंढरपूर)

*माण नदीचे मराठ्यांच्या इतिहासात योगदान*

औरंगजेबाची छावणी खवासपूर(सांगोला) येथे माण नदीच्या दोन्ही तीरावर सप्टेंबर १७०० रोजी पडली होती . मराठी मुलकात पावसाळा संपत येण्याची ही वेळ . त्यात सांगोला तालुक्यातून वाहणारी ही माण नदी फार मोठी नदी नाही. पावसाळ्यात चार दोन दिवस पूराचे पाणी आले तरी बस्स ! माण नदीच्या दोन्ही तीरांवर बादशाही सरदार, मनसबदार यांच्या छावण्या, तंबू, राहुट्या पडल्या होत्या. खुद्द माण नदीच्या पात्रात देखील काही सरदारांच्या राहुट्या पडल्या होत्या. यावेळी माण नदीचे पात्र कोरडे होते.

माण नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकड्यात ता.१ ऑक्टोबर १७०० चे रात्री मुसळधार पाऊस पडला . खवासपूर छावणीतील मोगली सैन्य गाढ झोपेत असताना या पावसाने आलेल्या पूराची लाट नदीच्या पात्रात घुसली. लाटेच्या तडाख्याने नदी तुडुंब भरून वाहू लागली. तसेच नदीच्या पलीकडे असलेल्या मैदानातही पाणी घुसले. माण नदीच्या अचानक आलेल्या पूराने छावणीतील अनेक माणसे आणि जनावरे पाण्याच्या ओघात वाहून गेली. उरलेल्या अनेकांची चीज वस्तू नाहीशी होऊन ते नंगे फकीर बनले. या मंडळीत अमीर - उमरावांचा देखील समावेश होता. बादशाही छावणीतील सर्व तंबू आणि इतर मालमत्ता यांची अमाप हानी झाली.

    मध्यरात्र होण्याच्या थोड्या आधी जेव्हा छावणीत पूराचा लोट कोसळला तेव्हा साऱ्या छावणीत मोठमोठ्याने एकच आरडाओरडा सुरू झाला. मराठे अचानक छावणीत घुसले असे औरंगजेबाला वाटले. त्यामुळे तोही दचकून जागा झाला. त्याचा पाय तंबूच्या कनाताचे दोराला अडखळून तो पडला. त्यामुळे त्याचा उजवा गुडघा निखळला. 

फौजेत शाही हकीम होते. त्यांनी तातडीने उपचार केले. पण बादशहाचा निखळलेला गुडघा त्यांना खोबणीत बरोबर बसविता आला नाही. त्यामुळे बादशहा मरेपर्यंत लंगडाच राहिला. पायाला झालेल्या दुखापतीमुळे औरंगजेब बादशहा सतत तीन दिवस दरबारात जाऊ शकला नाही.

तीन दिवसांच्या दुखण्यानंतर बादशहा दरबारात आला तेव्हा बादशहाचा आवडता शहाजादा कामबक्ष याने एक हजार अश्रफ्या, दोन हजार रुपये व एक स्फटिकाचा पेला ओवाळून टाकण्यासाठी म्हणून बादशहाला नजर केला. 

औरंगजेब बादशहाच्या प्रवासातील मजला ठरविणे व मुक्कामाची जागा निवडणे याला #खुशमंजील म्हणत. त्या अधिकाऱ्याने अशी ही धोक्याची जागा मुक्कामासाठी कशी निवडली याची विचारणा त्याने मुखालीसखानाला केली. तसेच या संबंधीत अधिकाऱ्याचे हुद्दे काय आहेत याची माहिती घेण्यास त्यास सांगितले.

खवासपूरच्या माण नदीच्या पात्रात अचानक आलेल्या पूरामुळे बादशहा अडकून पडल्याने त्याचा गुडघा निखळला . तो १९ नोव्हेंबर रोजी बरा झाला . बादशहाने या दिवशी आंघोळ केली. तसेच ज्या हकीमाने बादशहाच्या गुडघ्यावर उपचार केले त्यालाही बादशहाने खिलतीची वस्त्रे दिली.

माण नदी एक छोटीशी नदी !

कधीतरी पावसाळ्यात वाहणारी व इतर काळात ठणठणीत कोरडी राहणारी. या चिमुरड्या नदीने सुद्धा मराठ्यांच्या लढ्यात आपले योगदान दिले. काबुल कंदाहार पासून जिंजी वेलोरपर्यंत राज्य कारभार करणारा हा बादशहा तिने कायमचा लंगडा करून टाकला . त्यामुळे या नदीचेही हे ऐतिहासिक कार्य असेच म्हणावे लागेल .

संदर्भ – सोलापूर जिल्ह्याचा इतिहास - मराठा कालखंड

लेखक – गोपाळराव देशमुख(पंढरपूर)