8.26.2019

गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट कशी ओळखावी (Expiry of Gas Cylender)

 गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट कशी ओळखावी



जर आपल्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट संपली असेल तर तो *गॅस सिलेंडर म्हणजे आपल्या घरात जिवंत बाॅम्ब असल्या सारखे आहे* त्यामुळे खालील सुचना वाचून आपल्या गॅस वितरकाशी खात्री करा आणि सुरक्षित रहा. *कारण आपलं जीवन आपल्या घरच्यांकरता मौल्यवान आहे*
सिलेंडरच्या पकडण्यासाठी जी गोल लोखंडी रिंग असते. त्याच्या खाली तीन रंगाच्या पट्ट्या असतात. त्यातील काळ्या रंगाच्या पट्टीवर गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट असते. यावर A,B, C आणि D अक्षर असल्याचे स्पष्ट होते. तसच या अक्षरांसोबत दोन अंक लिहिले असतात. या अक्षरांवरुन गॅस सिलेंडर ची एक्सपायरी डेट लक्षात येते.

उदाहरणार्थ :

A - जानेवारी ते मार्च

B - एप्रिल ते जून

C - जुलै ते सप्टेंबर

D - अॉक्टोबर ते डिसेंबर

या शब्दांनंतर जे दोन अंक लिहिले आहेत त्यावरून हे लक्षात घ्यावे!!!

समजा आपल्या गॅस सिलेंडरवर A19 लिहिले असेल तर त्या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट आहे मार्च 2019. म्हणजे हा गॅस सिलेंडर मार्च 2019 नंतर वापरणे गृहिणीसाठी घातक आहे.

कृपया याबाबत आपल्या गॅस वितरकाशी संपर्क करुन माहिती घ्या !

8.21.2019

कधी कधी पैसा खूप महत्त्वाचा - प्रमोद खरात इचलकरंजी यांचा सुंदर लेख आहे तसा

मागच्या आठवड्यात कॅश मध्ये काम करत होतो.. साधारण 60-65 वर्षांचे एक आजोबा काऊंटर समोर आले आणि त्यांनी हात जोडून मला नमस्कार केला, मी ही त्यांना नमस्कार म्हणालो..त्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव होते. मनातील शंका विचारू की नको अशा द्विधा अवस्थेत वाटले मला ते.. त्यांच्या प्रश्नाला, उत्तरादाखल मी नाही म्हणालो तर काय होईल? या विवंचनेत ते असतानाच, जरा कचरतच, एकदम हळू आवाजात मला म्हणाले, साहेब एक विचारू का? मी म्हणालो, हा विचारा ना आजोबा. तर ते म्हणाले की साहेब, 700 रुपये निघतील काय माझ्या खात्यातून? मी त्यांचं अकाऊंट चेक केलं, तर त्यांच्या अकाऊंट मध्ये 702 रुपये होते. मी म्हणालो, आजोबा, तुमच्या खात्यात 702 रुपये आहेत, तर ते म्हणाले की, नाही म्हणजे, खात्यात 100 रुपये तरी ठेवायला लागत्यात नव्हं? मी म्हणालो हो, तेव्हढे तरी ठेवायला लागतील.थोडंसं अस्वस्थ झालेल्या त्या आजोबांनी परत एक आवंढा गिळून मला विचारलं, की साहेब एव्हढ्या टायमाला सगळच पैशे देता काय? गरज हाय ओ पैश्यांची.. पुरात सगळं वाहून गेलयं.

अस्वस्थता, नैराश्य, helplessness यामुळे झालेल्या त्यांच्या केविलवाण्या अवस्थेतील त्यांचे हे बोल मनाला खूप खोलवर लागले.. एखाद्यासाठी 100 रुपये इतके इतके इतके महत्त्वाचे असू शकतात याची जाणीव मलाही खूप अस्वस्थ करून गेली.. आपण साधा चहा जरी प्यायला गेलो तरी 100 रुपयांचे बिल ही आपण अगदी सहज pay करतो आणि त्याचं आपल्याला विशेष असं काहीच वाटत नाही.. पण इथे एक माणूस 100 रुपये, जे की त्यांचेच आहेत, ते मिळावेत म्हणून विनंती करतोय हे खूप हृदयद्रावक होतं.  मी म्हणालो, की आजोबा द्या तुम्ही स्लिप भरून, मी देतो तुम्हाला तुमचे 700 रुपये.. त्या आजोबांच्या चेहर्‍यावर जग जिंकल्याचा फील आला.. काय होतं त्या 100 रुपयांमध्ये हे त्यांनाच माहित.. पण माझा पहिला पगार झाल्यावर, जो की 19 हजारांपेक्षा जास्त होता, त्यावेळी मला जेव्हढा आनंद झाला होता, त्याच्यापेक्षा जास्त आनंद, त्या आजोबांना त्यांचे Extra चे 100 रुपये मिळणार म्हंटल्यावर झाल्याचा मला त्यांच्या चेहर्‍यावर दिसला. पैसे घेतल्यावर, त्या छोट्याश्या खिडकीतून त्यांनी त्यांचा हात आत घालून माझ्या हातात हात देऊन, "लई उपकार झाले साहेब तुमचे" असं म्हणत, खूप मोठं काहीतरी मिळाल्यासारखं ते आजोबा निघून गेले.

"लई उपकार झाले तुमचे साहेब" म्हणणारे ते आजोबाच नकळत माझ्यावर किती उपकार करून गेले होते हे त्यांनाही ठाऊक नसेल..  कितीही अस्वस्थ असलो तरी रागाने आणि चढ्या आवाजात न बोलता शांततेने आणि प्रेमाने बोलण्याची कला शिकवून गेले.. 700 रुपयांपैकी 600 मिळाले तरी त्याच्यामध्ये adjust कसे करायचे आणि आपल्याला असणार्‍या गरजांची priority असावी हे ही शिकवून गेले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनेक Financial Management ची पुस्तके वाचूनही जेव्हढी पैशांची किम्मत कळली नसती, तेव्हढी पैश्यांची किम्मत त्या आजोबांनी मला अवघ्या काही मिनिटांत शिकवली.

उपकार केले म्हणत, पण उपकार करून, समाधानकारकपणे आणि नकळत खूप काही शिकवून चाललेल्या, त्या सदरा, विजार आणि गांधी टोपी परिधान केलेल्या आजोबांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात माझ्या चेहर्‍यावर ही छोटीशी स्माईल आली, आणि "काका द्या इकडे ती स्लिप" असं पुढच्या कस्टमरना म्हणत माझं काम परत चालू झालं.

Those 100 rs.. Really really matters a lot to him..

*प्रमोद खरात इचलकरंजी*
*9689387700*

संकटाची चाहूल देणारा प्राणी

संकटाची चाहूल देणारा प्राणी


कुत्रा हा पाळीव प्राणी म्हणून घर-घरात पाळला जातो. ग्रामीण भागात कुत्रा हा अत्यंत महत्वाचा प्राणी मानला जातो. कारण तो घराची व शेताची राखण करतो. म्हणून कुत्रा हा शेतकऱ्याचा भरोसेमंद साथीदार व इमानदार प्राणी समजले जाते. चोर किंवा अनोळखी  माणसाला तो आपल्या घराच्या परिसरात येऊ देत नाही. तो भुंकून भुंकून आपल्या धन्याला सावध करण्याचा प्रयत्न करो. पण कधी कधी गावातील सर्व कुत्री एकसाथ मोठमोठ्यने ओरडायला लागतात. ते का ओरडतात हे कारण कोणाला पक्के माहित नसते. पण जेव्हा जेव्हा  म्हणून  ते ओरडतात तेव्हा लोक त्या कुत्र्यांना मारतात. हाकलून लावतात.  काहीतरी अशुभ घडेल म्हणून ही मारतात. जेव्हा त्यांच्या प्रजननाचा काळ असतो त्यावेळी ही हे कुत्रे ओरडतात. परंतुkकुत्र्यांचे ओरडणे हि कुठल्या तरी धोक्याची सूचना असते. असे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.  कोल्हापूर मधील आंबेवाडी या गावातील लोकांनी या कुत्र्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले. साहजिक आहे , यांच्या प्रजननाचा काळ आहे म्हणून काही कुत्री ओरडत असतील. पण यावेळी सगळेच कुत्री ओरडत होती. यावेळी कोणी लक्ष नाही दिले.
                   ते सगळे कुत्रे ओरडून रात्रीच ते गाव सोडून निघून गेले. लोकांना प्रश्न पडला हे सगळे कुत्रे गेले कुठे असतील. मग जेव्हा गाववाले सकाळी उठले तर पाहतात तर नदीचा पूर त्यांच्या घरात शिरला आहे.. नदीला महापूर आला आहे. पुढच्या 10 दिवसांनी ते पूर निघून गेल्यावर, ती कुत्री परत आले.
हे  पाहून सगळे गावकरी अचंबित झाले. तेव्हा समजले हे कुत्री का ओरडत होते .
येणाऱ्या संकटाची चाहूल आधी मुक्या प्राण्यांना लागते. व ते आपल्याला अनेक प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्या हालचालीकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा त्याची किमत माणसाला मोजावी लागे. कारण या निसर्गात  प्रत्येक कण , प्रत्येक जीव एकमेकांशी जोडला आहे.tत्याचे मोल जाणून घ्या. 

                  

8.17.2019


पक्ष्यांचे वय किती ?


पक्षी किती वर्ष जगतात हा नेहमीच भेडसावणारा प्रश्न आहे. कारण पक्षी म्हातारे झाल्याचे क्वचितच पहावयास मिळतात. परंतु त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येत नाही.  नैसर्गिक परिस्थितीत कोणता पक्षी किती वर्षे जगतो हे सांगणे कठीण आहे.  अनेकवेळा आजाराने किंवा विषबाधा झाल्याने पक्षी मृत झालेले आपणास पहावयास मिळतात. लहान पक्षी नैसर्गिक परिस्थितीत पाच वर्षे जगतात. मात्र बंदिवासात असणारे हेच पक्षी सहा ते सात वर्षे किंवा जास्त दिवस जगताना आढळून आले आहे. 

           लहान पक्ष्यांपेक्षा मोठ्या पक्ष्यांना जास्त आयुष्य असते. गरुड, कावळे, हंस, असे पक्षी २५ ते ३० वर्षापर्यंत जगतात. पण बंदिवासात याच पक्ष्यांची आयुमर्यादा जास्त असते. पिंजऱ्यात ठेवलेला डोमकावळा ६५ ते ७० वर्ष, शहामृग ४० वर्षे, ससाणा ३५ ते ४० वर्षे,  घुबड ६८ वर्षे, गरुड ५० वर्षे, हंस २५ वर्षे, कबुतर २५ वर्षे,  मोर बंदिवासात  २० ते २५  वर्षापर्यंत जगतो तर नैसर्गिक परिस्थितीत १५ ते २० वर्षे जगतो. बंदिवासात गरुड ५० ते ७०  वर्षापर्यंत जगल्याच्या नोंदी आहेत. पोपट १५ ते २० वर्षे, काही पोपटांच्या प्रजाती  बंदिवासात ५०ते ८० वर्षे जगल्याची नोंद आहे. अंटार्क्टिकावर आढळणारा पेंग्विन पक्षाचे आयुर्मान हे जास्तीत जास्त २६ वर्षे असते.

कावळा हा अमर आहे  हा गैरसमज आहे. साधारणतः कावळा  १५ ते २० वर्षे जगतो मात्र बंदिवासात ८० वर्षे जगल्याची नोंद आहे. गिधाडे  अनेक शतके जगतात हा दुसरा गैरसमज लोकांमध्ये आहे.  परंतु गिधाडाचे आयुर्मान ५२ वर्षे आहे.




पक्षी किती अंडी घालतात.


अनेक  वैशिष्ट्यापैकी अंडी घालणे हे पक्ष्यांचे  प्रमुख वैशिष्ट्य आहे. कोबडी, पाळीव बदक इत्यादी पक्षी कुकुटपालन व्यवसायासाठी वापरले जातात.  अलीकडे  शहामृग पालन हा व्यवसाय पोल्ट्री व्यवसायासाठी उपयुक्त असल्याने मोठ्या प्रमाणावर विकसित होत असताना दिसते. हे पक्षी व्यवसायासाठी निवडण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांची अंडी घालण्याची प्रचंड क्षमता हे होय. पोल्ट्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्या वर्षाला २५० ते ३०० अंडी देतात. शहामृगाची मादी एका वर्षात ४० ते ६० अंडी घालते. शहामृगाचे अंडे सर्वात मोठे असून ७ इंच असते तर  वजन १.० ते १.५  किलोपर्यंत असू शकते.हमिंग बर्ड हा सर्वात लहान पक्षी असून त्याचे अंडे हे आकाराने सर्वात लहान असते. हमिंगबर्ड चे अंडे १० मिमी पेक्ष्या लहान असून ०.३६ ग्रम एवढे वजन असते. 


 

पक्ष्यांच्या बाबतीत  अंडी घालण्याचे  प्रमाण अत्यल्प असून पक्ष्यांचे विशिष्ठ विणीचे हंगाम असतात. व त्यानुसार पक्षी अंडी घालत असतात.  एका क्षेत्रात राहणारे एकाच जातीचे पक्षी घालीत असलेल्या अंड्यांची संख्या बहुतेक सारखीच असते. पक्ष्यांची अंडी घालण्याची क्षमता व प्रमाण पक्ष्यांच्या आकारमानावर अवलंबून नसते.  


बदके व लावासारखे पक्षी जास्त अंडी घालतात. लावा पक्षी २० पर्यंत किंवा जास्त अंडी घालतात. पेग्वीन आणि उष्ण प्रदेशातील कबुतरे एकच अंडे घालतात. शिंपी, कोतवाल, कावळा, सातभाई, ब्राम्हणी मैना, खाटिक, टिटवी इ. पक्षी ३ ते ४ अंडी घालतात. भारद्वाज ४ ते ६ अंडी घालतो. धोबी ३ ते ८ अंडी घालतो. धीवर / खंड्या एका खेपेला १० अंडी घालतो. टिटवी ४ अंडी घालते. राष्ट्रीय पक्षी मोर ६ अंडी घालतो.  आपली प्रजाती निसर्गात टिकून राहीली पाहिजे. त्यासाठीच  पक्षांचा हा खटाटोप असतो.


Dr. Vidhin Kamble 
                                                                                       Pleases share