6.22.2021

(फादर्स डे)

 

                                             बाप दिवस (फादर्स डे)




बापावर प्रेम करणारी सुज्ञ पोरं लाभणे ही त्याची फार मोठी उपलब्ध मानली जाते. संपत्ती कितीही असूनही अपत्य नीट नसेल तर ती आपत्ती ठरते. ज्यांना चांगले अपत्य लाभतात, खरंच ती माणसं भाग्यवान. कारण अनेकांना मुलांचं प्रेम मिळत नाही, सन्मान मिळत नाही. मुलांच्या प्रेमासाठी तरसणा-या बापाच्या हृदयाच्या ठिक-या होतात, हे किती जणांच्या लक्षात येत असेल. बापाच्या हृदयाला झालेल्या जखमांवर कोणताही डॉक्टर उपचार करु शकत नाही. यावर मुलांचं प्रेम हेच एकमेव औषध रामबाण औषधी ठरते. मुलाची अधोगती पाहून' माझं कसं होईल याची चिंता बाप करत नाही, लेकराचं कसं होईल म्हणून तो तळमळतो, हे समजायला बापच व्हावे लागते.

आईच्या तुलनेत बापाला फारच कमी महत्व दिले गेले आहे. आई जितकी महत्त्वाची तितकाच बापही महत्वाचा असतो. परंतु साहित्यिकांनी, लोकवाड्मय निर्मात्यांनी आईची सर्वाधिक महती गायली. बापाकडे दुर्लक्ष झाले. आई प्रेम व्यक्त करते. आई म्हणजे प्रेमाचा सागर असेच मुलांना ऐकायला आणि वाचायला मिळत असते. खरं तर आई म्हणजे व्यक्त प्रेम आणि बाप म्हणजे काही राग नसतो. बाप म्हणजे अव्यक्त प्रेम असते, याची जाणीव मुलांना करुन देणे गरजेचे आहे.

आई सतत कृती आणि उक्तीतून व्यक्त होत राहते. संस्कार करण्यासाठी तिची धडपड असते. मग ती बापाची भीती दाखवून मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करते. 'हे करु नकोस बाबा मारतात' 'ते करु नको बाबा ओरडतात.' हे ऐकून ऐकून मुलांच्या मनात बापाविषयी भीती निर्माण होते. भीती आहे तिथे प्रेम कसे विकसित होईल? सतत नकारात्मक ऐकायला मिळालेल्या मुलांना बाप म्हणजे खलनायक वाटायला लागतो. त्यांच्या मनात प्रेमाऐवजी रागच निर्माण होतो.

मग अनेक मुलं बापाला प्रेम न देता टाळत राहतात. हे बापाच्या लक्षात येते तरी बाप मुलांसाठी खस्ता खाणं थांबवत नाही. पैशाअभावी लेकराचं शिक्षण थांबू नये म्हणून उन्हातान्हात तो राबतो. घाम गाळत असतो. लेकराचं शिक्षण थांबता कामा नये म्हणून आईही बापाला तगादा लावते, भांडते. वेळप्रसंगी अश्रू ढाळते. मुलं हे सर्व पाहतात. लेकरांना वाटते आई आपल्यासाठी किती तळमळते. अश्रू ढाळते.

बापाच्या डोळ्यात अश्रू दिसत नाहीत. बापाला माहित असते की रडून प्रश्न मिटत नाहीत. जीवनाची लढाई लढत पुढे जावे लागते. बाप रडत नाही, तो विचारमग्न राहतो. चिंताग्रस्त होतो. लेकरांच्या शिक्षणासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करायची? कुणासमोर हात पसरुन उसने पैसे मागायचे? कुणाकडून कर्ज घ्यायचे? या विचारात मग्न असलेला बाप काही काळ मुका होतो. आईला मुलं विचारतात आई, बाबा असे गप्प का? पैशाचं काय म्हणतोय? कधी कधी आई रागाच्या भरात सांगून टाकते, ते असंच करतात. पैसा द्यायचं म्हटले की, त्यांचं रडगाणे सुरुच होते. पोरांचा गैरसमज होतो की बाप मुद्दाम असे करतो. मनात आधीच भीती, राग. आता हे ऐकून एक वेगळीच अढी मुलांच्या मनात तयार होते. बाप मात्र तळमळ करुन पैशाची जोड लावून आणतो तेव्हा आई म्हणते," किती तोंड वाजवावे लागले तेव्हा कुठे पैसे आणले."

पोरांनाही वाटते आईनं रडबोंब केल्यामुळेच आपल्या शिक्षणाला पैसे मिळाले. नाहीतर काही खरं नव्हतं.

खरं तर इतकी धडपड करुन पैसे आणण्यामागे पोरांच्या बापाचं पोरांविषयी प्रेम आहे हे त्या आईला माहीत असते पण ती तसं फारसं बोलत नाही. मुलं तर लहानच असतात, त्यांना बापाच्या मुक राहून केलेल्या कृतीमागचं प्रेम कळत नाही. ह्यात बदल होणे गरजेचे आहे.

आईची जबाबदारी आहे बापाचे कष्ट आपल्या पोरांच्या लक्षात आणून देणे. बापाच्या विषयी नकारात्मक बोलू नये. वादही मुलांसमोर घालू नयेत. यासाठी बापानेही काळजी घेतली पाहिजे. बापाचे महत्त्व पोरांना पटवून दिले तर नक्कीच पटते त्यांना.

बापाविषयी सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी आईची भूमिका महत्त्वाची आहे. या संदर्भात आयांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.

मुलांच्या तुलनेत अनेक मुली बापाला समजून घेतात. प्रेम देतात. सेवा करतात. आई भांडत जाऊ नकोस ग बाबांशी ! अगं बाबांच्या कष्टामुळेच आपलं घर चालते याची जाणीव करुन देतात. तेव्हा बापाच्या जखमा भरुन निघतात, बापाचं मन भरुन येते.

 *आपल्याला समजून घेणारी मुलगी सासरी जाताना बाप अश्रू आवरु शकत नाही. तो ढसाढसा रडायला लागतो. मुलींप्रमाणे मुलांनी पण आई समजून घेताना बापही समजून घेण्याची गरज आहे.

 फादर्स डेच्या निमित्ताने एवढा संकल्प करणे ही बापासाठी मोठी गिफ्ट ठरेल.

लेकरांसाठी तळमळणा-या बापाने आपल्यासाठी काय केलंय असे वाटत असेल तर आपण राहतो ते घर, अंगावरचे कपडे, पोटातील अन्न, आतापर्यंत केलेला सांभाळ यासाठी बापाचे कष्ट आठवून बघितले पाहिजे. ज्यांचा बाप जीवंत आहे त्या भाग्यवान मुलांनी बापाला एकदा म्हणून पहा, "बाबा आमच्यासाठी किती कष्ट घेतो. आम्हाला भारी किमतीचे कपडे, चप्पल, बूट तुम्ही मात्र हे सर्व कमी किमतीचे वापरता. खरंच बाबा तुम्ही ग्रेट आहात'!  किती फुलेल बाप मग. उन्हात तळायला हत्तीचे बळ येईल. पोरांनो, आपण मोठे झालो की आपला बाप पण खूप मोठा होतो.

एकदा कलेक्टर असलेल्या आपल्या पोराला भेटायला शेतकरी बाप जिल्हाधिकारी कार्यालयात जातो. तेव्हा अहो, ताडताड कुठे जाताय. स्वतः ला कलेक्टर समजताय का? असे तेथील एक कर्मचारी म्हणतो. तेव्हा हा बाप अभिमानाने सांगतो "मी कलेक्टर नाही, मी कलेक्टरचा बाप आहे.

     आपल्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणावरुन प्रगती साधत पुढे जाणे ही बाब बापासाठी सर्वांत मोठी भेट ठरेल, असा संकल्प करणे, बापाला समजून घेणे, प्रेम देणे, सन्मान देणे असे घडले तर फादर्स डे अर्थपूर्ण ठरेल

 

Source Sangola Teacher Whatsapp group

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home